थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 23:14 IST2025-10-08T23:14:04+5:302025-10-08T23:14:25+5:30
Thailand Tourism : भारतामधून थायलंडला पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यंटकांची संख्या खूप मोठी आहे. स्वस्त विमान तिकीट, निसर्गरम्य समुद्र किनारे आणि कलरफूल नाईटलाईफ यामुळे भारतीय पर्यंटकांसाठी थायलंड हे आवडतं पर्यंटन स्थळ बनलेलं आहे. मात्र आता भारतीय पर्यटकांना थायलंडमध्ये पर्यटनासाठी जाणं थोडं महाग पडू शकतं.

थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड
भारतामधून थायलंडलापर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यंटकांची संख्या खूप मोठी आहे. स्वस्त विमान तिकीट, निसर्गरम्य समुद्र किनारे आणि कलरफूल नाईटलाईफ यामुळे भारतीय पर्यंटकांसाठी थायलंड हे आवडतं पर्यंटन स्थळ बनलेलं आहे. मात्र आता भारतीय पर्यटकांना थायलंडमध्ये पर्यटनासाठी जाणं थोडं महाग पडू शकतं. त्याचं कारण म्हणजे थायलंड सरकार एक नियम लागू करत असून, या नियमानुसार थायलंडमध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांकडून ३०० बाट (थाई चलन) एवढा कर वसूल करण्यात येणार आहे. भारतीय चलनामध्ये ३०० बाटची किंमत ८२० रुपये एवढी होते. ही रक्कम थायलंडमध्ये येणाऱ्या प्रत्येक परदेशी व्यक्तीकडून वसूल करण्यात येणार आहे.
थायलंड सरकारने ही योजना २०२० मध्येच आखली होती. मात्र आता पाच वर्षांनंतर ही लागू करण्यात येत आहे. देशाचे नवे पर्यटनमंत्री अट्ठाकोर्न सिरिलत्तयाकोर्न यांनी सांगितले की, ‘माझ्या कारकिर्दीत मी हा कर लागू करणार आहे’. दरम्यान, आधी हा कर विमान आणि रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांसाठी वेगवेगळा होता. यापूर्वी विमानातून येणाऱ्या प्रवाशांकडून ३०० बाट आणि सागरी किंवा रस्ते मार्गाने येणाऱ्यांकडून १५० बाट वसूल करण्याची योजना होती. मात्र आता सर्वच प्रवाशांकडून ३०० बाट वसूल करण्यात येणार आहेत.
सध्यातरी हा कर कधीपासून वसूल करायचा याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र नियम आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चार महिन्यांच्या आत हा कर लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार हा कर २०२६ च्या अखेरीपासून आकारण्यास सुरुवात होऊ शकतो. याचा अर्थ जर तुम्ही येणाऱ्या काळात थायलंडच्या प्रवासाचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये थोडी अधिकची तरतूद करावी लागणार आहे.
दरम्यान, हा कर आकारण्यामागे नेमका काय हेतू आहे हे पर्यटकांना समजावून सांगण्याची सूचना सरकारने संबंधिक यंत्रणांना दिली आहे. कराच्या रूपात वसूल केली जाणारी ही रक्कम कुठे खर्च होणार हे पर्यटकांना सांगणे आवश्यक असल्याचे थायलंड सरकारचे मत आहे. या पैशांमधून येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी विमा कव्हर आणि पर्यटनाशी संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर सुधारला जाणार आहे. म्हणजेच प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा वाढवण्यासाठी हा कर आकारण्यात येणार आहे.