'भारतात निघून जा...' आयर्लंडमध्ये ६ वर्षांच्या भारतीय मुलीवर हल्ला; आई म्हणाली, 'ती मुलं हसत होती'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 09:49 IST2025-08-07T09:49:16+5:302025-08-07T09:49:58+5:30
आयर्लंडमध्ये एका सहा वर्षाच्या भारतीय वंशाच्या मुलीवर तिथल्या अल्पवयीन मुलांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

'भारतात निघून जा...' आयर्लंडमध्ये ६ वर्षांच्या भारतीय मुलीवर हल्ला; आई म्हणाली, 'ती मुलं हसत होती'
Indian Origin Girl Attack in Ireland: परदेशात भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांचे प्रमाण गेल्या काही काळापासून वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आल्याची प्रकरणं समोर आली होती. त्यानंतर आता आयर्लंडमध्ये एका सहा वर्षाच्या भारतीय वंशाच्या मुलीवरही हल्ला करण्यात आला. घराबाहेर खेळत असताना काही मुलांनी ६ वर्षांच्या मुलीला जबर मारहाण केली आणि भारतात निघून जा असं म्हणत धमकावलं. मारहाण करणारी मुलं ही अल्पवयीन असल्याचे समोर आलं आहे. दरम्यान याआधी आयर्लंडची राजधानी डब्लिनमध्येही भारतीय कॅबचालकावर विनाकारण हल्ला करण्यात आला.
आयर्लंडमध्ये अल्पवयीन मुलांच्या एका गटाने भारतीय वंशाच्या सहा वर्षांच्या मुलीवर हल्ला केला आणि भारतात परत जा असं म्हणत धमकावलं. वॉटरफोर्डमधील मुलीच्या घराबाहेर हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. हल्लेखोरांनी मुलीच्या गुप्तांगावर सायकलच्या चाकाने हल्ला केले. मुलीची आई आठ वर्षांपासून आयर्लंडमध्ये राहत आहे आणि नुकतीच ती आयर्लंडची नागरिक झाली आहे. मुलीवर १२ ते १४ वयोगटातील मुलांनी हल्ला केल्याचे तिच्या आईने सांगितले.
४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत घराबाहेर खेळत होती. मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, मुलांचा गट तिथे आला ज्यामध्ये आठ वर्षांची मुलगी आणि १२ ते १४ वर्षे वयोगटातील अनेक मुले होती. आई तिच्या मुलीला इतर मुलांसोबत खेळताना पाहत होती. अचानक तिचा १० महिन्यांचा मुलगा रडू लागला आणि नंतर तिला त्याला खायला घालण्यासाठी घरात गेली. तितक्यात त्या मुलांनी मुलीवर हल्ला केला.
"मी मुलीला सांगितले की मी मुलाला दूध पाजून परत येत. पण मुलगी एक मिनिटानंतर अस्वस्थ होऊन घरी परतली. ती खूप अस्वस्थ होती, ती रडत होती. तिला बोलता येत नव्हते, ती खूप घाबरली होती. मुलीच्या मैत्रिणीने मला सांगितले की त्यापैकी पाच जणांनी तिच्या तोंडावर बुक्की मारली. एका मुलाने तिच्या गुप्तांगावर सायकलच्या चाकाने मारले, ज्यामुळे तिला खूप वेदना होत होत्या. त्यांनी एफ हा शब्द वापरला आणि घाणेरडे भारतीय, भारतात परत जा अस म्हटलं. तिच्या मानेवर बुक्की मारली आणि तिचे केस ओढले," असं मुलीच्या आईने सांगितले.
आम्हाला आता इथे सुरक्षित वाटत नाहीये, अगदी आमच्या घरातही नाही. मला तिच्याबद्दल खूप वाईट वाटते. मी तिचे रक्षण करू शकले नाही. असे काही घडेल असे मला कधीच वाटले नव्हते. मला वाटले होते की ती इथे सुरक्षित असेल. मी नंतर त्या मुलांना पाहिले. ते माझ्याकडे पाहून हसत होते. ती मुले कदाचित १२ किंवा १४ वर्षांची असतील आणि घटनेनंतरही ती तिथेच फिरत होती, असंही पीडितेच्या आईने म्हटलं.
दरम्यान, मुलीवर हल्ला करणाऱ्या मुलांबद्दल आईने पोलिसांना माहिती दिली आहे. पण तिला त्यांना कोणतीही शिक्षा नको आहे. उलट तिने त्यांना समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन हवं आहे असं म्हटलं.