अर्ध्या जगाला महिनाभर करावा लागला प्रचंड उकाड्याचा सामना; आजारपण, मृत्यूही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:57 IST2025-05-31T12:57:08+5:302025-05-31T12:57:42+5:30

१ मे २०२४ ते १ मे २०२५ या काळात अर्ध्या जगाला किमान एक महिना अति उकाड्याचा सामाना

Global Warming Half the world had to deal with extreme heat for a month | अर्ध्या जगाला महिनाभर करावा लागला प्रचंड उकाड्याचा सामना; आजारपण, मृत्यूही वाढले

अर्ध्या जगाला महिनाभर करावा लागला प्रचंड उकाड्याचा सामना; आजारपण, मृत्यूही वाढले

वॉशिंग्टन : विकासाच्या नावाखाली होत असलेल्या निसर्गाच्या न्हासाचे परिणाम हवामान बदलाच्या रूपात दिसू लागले आहेत. हवामान बदलामुळे सातत्याने उष्णतेच वाढ होत आहे. या मानवनिर्मित हवामान बदलाचा फटका जगातील ४ अब्ज लोकांना बसल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. १ मे २०२४ ते १ मे २०२५ या काळात अर्ध्या जगाला किमान एक महिना अति उकाड्याचा सामाना करावा लागल्याचे वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन, क्लायमेट सेंट्रल आणि रेड क्रॉसच्या संशोधनात म्हटले आहे.

वाढत्या उष्णतेमुळे आजारांसोबतच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एवढेच नाही, तर हवामान बदलामुळे ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. अचानक येणारे पूर व चक्रीवादळाची चर्चा प्रचारमाध्यमांमध्ये होत असली तरी या संकटापेक्षा भयंकर संकट वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होत असल्याचा दावा अहवालात केला आहे.

मृत्यूसाठी चुकीची कारणे

जगभरात उष्णतेशी संबंधित कारणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या मृत्यूची योग्यरीत्या नोंद होत नाही. उष्णतेमुळे झालेल्या मृत्यूला हृदयरोग किंवा मूत्रपिंड निकामी होणे यासारखी चुकीची कारणे दिली जातात.

या लाटा 'सायलेंट किलर' 

 उष्णतेच्या लाटेत लोक रस्त्यावर पडून मरत नाहीत. ते रुग्णालयात किंवा घरांमध्ये मरतात. म्हणून अशा लोकांच्या मृत्यूच्या कारणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे उष्णतेच्या लाटा सायलेंट किलरप्रमाणे काम करत आहेत.

गरिबांना सर्वाधिक त्रास 

गरीब, कमी उत्पन्न असलेले समुदाय, तसेच आजारी, वृद्ध यासारख्या असुरक्षित लोकांना उष्णतेचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा या संशोधनात केला आहे.

...तरच मिळेल दिलासा 

हवामान बदलामुळे सातत्याने वाढत असलेली उष्णता कमी करण्यासाठी जीवाश्म इंधनाचा वापर टप्याटप्याने बंद करावा लागेल. तसे केले नाही तर उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होतील व त्यांचे प्रमाणदेखील वाढेल, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
 

Web Title: Global Warming Half the world had to deal with extreme heat for a month