युद्धातच स्ट्रेट होर्मुझमध्ये 'भुताटकी'; हातोड्याने तोडून नष्ट केलेलं जहाज पुन्हा समुद्रात कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 17:52 IST2026-03-23T17:52:03+5:302026-03-23T17:52:58+5:30
फेब्रुवारीच्या अखेरीस पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून जगातील व्यापारी जहाज वाहतुकीचा एक प्रमुख जलमार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी जवळजवळ बंद झाली आहे

युद्धातच स्ट्रेट होर्मुझमध्ये 'भुताटकी'; हातोड्याने तोडून नष्ट केलेलं जहाज पुन्हा समुद्रात कसे?
पश्चिम आशियातील वाढत्या तणावात वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. त्यात हैराण करणारी बाब उघडकीस आली आहे. स्ट्रेट होर्मुझ भागातून असा तेल टँकर प्रवास करताना आढळला ज्याला अनेक वर्षापूर्वी नष्ट करण्यात आले आहे. अलीकडच्या काळातील ही दुसरी घटना आहे. झॉम्बी शिप नावाने ही जहाजे ओळखली जातात. या तणावाच्या स्थितीत गायब झालेली जहाजे पुन्हा कशी परतली असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
नबीन(NABIIN) नावाने ओळखलं जाणारे हे जहाज रविवारी संध्याकाळी पर्शियन खाडीत ट्रॅक करण्यात आले आणि सोमवारी सकाळपर्यंत ते ओमानच्या खाडीत पोहचले होते. ब्लूमबर्गकडून पडताळणी करण्यात आलेल्या रेकॉर्डनुसार, हे Aframax श्रेणीतील हे टँकर २००२ मध्ये बनवण्यात आले होते. जवळपास ५ वर्षापूर्वी बांगलादेशात शिप ब्रेकिंग यार्डात ते पाठवण्यात आले होते. मग हे जहाज परत कसे आले असा प्रश्न उभा राहतो. नबीन नावाचे जहाज युद्ध सुरू होण्याच्या काही तास आधी ते पर्शियन आखातात दाखल झाले होते आणि त्याने इराकमधील खोर अल-झुबैर हे आपले अंतिम स्थान असल्याचं सांगितले होते. त्यानंतर ते आखाती प्रदेशात राहिले आणि नंतर निघून गेले.
त्यानंतरच्या ट्रॅकिंग सिग्नलमधील इलेक्ट्रॉनिक व्यत्ययामुळे त्याच्या नेमक्या हालचाली कळू शकल्या नाहीत. आखात सोडल्यानंतर जहाजाच्या ड्राफ्ट रीडिंगनुसार ते पूर्णपणे भरलेले होते, परंतु त्याने आपले पुढील ठिकाण सांगितले नाही. इक्वासिस डेटाबेसनुसार, दुबईस्थित मुहित मेरिटाइम एफझेडई आणि सगिता मेरिटाइम कोऑपरेशन लिमिटेड यांना जहाजाचे व्यवस्थापक आणि मालक म्हणून सांगण्यात आले. दोन्ही कंपन्यांचे संपर्क तपशील सारखेच आहेत परंतु त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
स्ट्रेट होर्मुझमध्ये काय परिस्थिती?
फेब्रुवारीच्या अखेरीस पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून जगातील व्यापारी जहाज वाहतुकीचा एक प्रमुख जलमार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी जवळजवळ बंद झाली आहे. याचा जहाजांच्या वाहतुकीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला. जर तसे न केल्यास इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला करू अशी धमकी दिली. परंतु जर आमच्यावर हल्ला झाला तर हा जलमार्ग पूर्णपणे बंद करण्याची धमकी देऊन इराणने प्रत्युत्तर दिले आहे. आतापर्यंत या मार्गातून जाण्यात यशस्वी झालेली जहाजे एकतर इराणशी संबंधित आहेत किंवा त्यांना तेहरानची परवानगी आहे. काही जहाजे आपली ओळख लपवण्यासाठी ट्रॅकिंग सिस्टीम बंद करत आहेत, जेणेकरून त्यांचे स्थान उघड होऊ नये.