५ मुलांच्या खुनाचं प्रायश्चित्त.. तिचं इच्छामरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 08:58 AM2023-03-09T08:58:15+5:302023-03-09T08:59:46+5:30

इच्छामरण कायदेशीर केलं तर ते अत्यंत भयावह पद्धतीने वापरलं जाईल अशी भीती बहुतेक देशांना वाटते.

Genevieve Lhermitte 56 murdered her five children with kitchen knives in their family home Belgian woman asked euthanasia | ५ मुलांच्या खुनाचं प्रायश्चित्त.. तिचं इच्छामरण!

५ मुलांच्या खुनाचं प्रायश्चित्त.. तिचं इच्छामरण!

googlenewsNext

इच्छामरण हा जगभरात कायमच वादाचा विषय राहिलेला आहे. इच्छामरण कायदेशीर केलं तर ते अत्यंत भयावह पद्धतीने वापरलं जाईल अशी भीती बहुतेक देशांना वाटते. त्यामुळे बहुतेक सगळ्या देशांमध्ये इच्छामरण बेकायदेशीर आहे. त्याच वेळी अनेक देशांमध्ये इच्छामरण कायदेशीर करावं यासाठी लोक चळवळी चालवत असतात. इच्छामरण कायदेशीर करावं असं म्हणणाऱ्यांना वाटत असतं की एखादी व्यक्ती जर दुर्धर रोगाने ग्रस्त असेल, अत्यंत वेदनादायक आयुष्य जगत असेल किंवा तिची परिस्थिती कधीही सुधारणार नाही अशी असेल तर त्या व्यक्तीला जीवन संपवावंसं वाटणं नैसर्गिक आहे. असं वाटणाऱ्या व्यक्तींना जर आयुष्य संपवावंसं वाटलं तर त्याला कायद्याने आडकाठी करू नये. याउलट इच्छामरणाला विरोध करणारे लोक म्हणतात की इच्छामरण हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर जवळचे नातेवाईक किंवा इतर लोक स्वतःच्या फायद्यासाठी सहज करू शकतात. दुसरं म्हणजे आयुष्य संपवणं ही काही माणसाची मूळ वृत्ती नाही. माणसाच्या मनात जीवन संपवण्याचे विचार येतात ते एकतर क्षणिक असतात किंवा मानसिक अनारोग्यामुळे असतात. या दोन्ही कारणाने माणसाने स्वतःचा जीव घेणं आणि त्याला कायद्याने मान्यता देणं योग्य नाही. क्षणिक भावना असेल आणि त्यामुळे जीवन संपवलं तर ते फारच दुर्दैवी ठरेल. एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य चांगलं नसल्याने आत्महत्त्या करावीशी वाटत असेल तर त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

इच्छामरण हा विषयच असा आहे, की त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेले मुद्दे कधी संपत नाहीत. त्यामुळेच इच्छामरण बेकायदेशीर ठरवणारे देश आहेत, तसं असेही काही देश आहेत जिथे इच्छामरण कायदेशीर आहे. नेदरलँड्स, बेल्जियम, लक्झम्बर्ग, कोलंबिया आणि कॅनडा या देशांमध्ये इच्छामरण कायदेशीर आहे. त्याशिवाय अमेरिकेतील पाच राज्ये, स्वित्झर्लंड आणि जर्मनी या ठिकाणी मदत घेऊन केलेली आत्महत्या कायदेशीर आहे.

यापैकी बेल्जियम या देशात २८ फेब्रुवारीला जेनेविव ल्हेर्मिट या ५६ वर्षांच्या महिलेने इच्छामरण पत्करलं. पण या महिलेची कथा फार चमत्कारिक आणि हृदयद्रावक आहे. सोळा वर्षांपूर्वी २८ फेब्रुवारी याच दिवशी स्वतःच्या ३ ते १४ वयोगटातील ५ मुलांची गळा चिरून तिने हत्या केली होती. त्यानंतर स्वतःलाही भोसकून जीव देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी ठरल्याने तिने तातडीच्या आरोग्यसेवेला फोन करून बोलावून घेतलं होतं. ही घटना घडली त्यावेळी मुलांचे वडील घरी नव्हते. त्यावेळी बेल्जियममध्ये या घटनेने मोठी खळबळ उडवली होती.

या घटनेननंतर जेनेविवला अटक करण्यात आली. हे खून करण्यापूर्वी ती मानसोपचार तज्ज्ञांची ट्रीटमेंट घेत होती. त्यामुळे तिच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याने तिला शिक्षा होऊ नये. मात्र न्यायालयाने सर्व पुरावे बघितले. त्यावरून त्यांचं मत असं झालं की तिने या हत्या करण्यापूर्वी पुरेसा विचार केलेला होता आणि त्यासाठी नियोजनही केलेलं होतं. त्यामुळे जेनेविवला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. २००९ साली तिची रवानगी तुरुंगात झाली. त्यानंतर ती तुरुंगातच होती.

जेनेविवने तिच्या मानसोपचारतज्ज्ञावर ३० लाख डॉलर्सचा दावा ठोकला. तिचं म्हणणं असं होतं की त्याने तिच्यावर योग्य उपचार केले नाहीत. जर त्याने योग्य उपचार केले असते तर हे खून टळले असते. परंतु १० वर्षे कोर्टात लढल्यानंतरदेखील तिला त्या दाव्यात यश मिळालं नाही. त्यामुळे तिने नाइलाजाने तो दावा सोडून दिला. शेवटी तिने सरकारकडे इच्छामरणाची परवानगी मागितली. बेल्जियम कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला असह्य मानसिक त्रास होत असेल तर त्याला इच्छामरणाला परवानगी देता येऊ शकते. त्यासाठी केवळ शारीरिक त्रास असणं बेल्जियम कायद्याने पुरेसं नाही. आणि जेनेविवने माझं मानसिक आरोग्य असह्य होण्याइतकं खालावलं आहे अशी मांडणी करूनच इच्छामरणाची परवानगी मिळवली. त्यासाठी अनेकानेक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. पण शेवटी तिला तिचं आयुष्य संपवण्याची परवानगी देण्यात आली.

स्वत:च्या वाढदिवशीच संपवलं आयुष्य!
जेनेविवने स्वतःचं आयुष्य संपवण्यासाठी २८ फेब्रुवारी हीच तारीख निवडली. सोळा वर्षांपूर्वी तिच्या हातून मारल्या गेलेल्या तिच्या निष्पाप मुलांच्या मृत्यूबद्दल तिने घेतलेलं हे एक प्रकारचं प्रायश्चित्त आहे असं काही जणांना वाटतं आहे. कोणी असंही म्हणतंय की सोळा वर्षांपूर्वी तिने जे केलं त्याचा हाच शेवट तिला अपेक्षित होता. कारण त्याही वेळी तिने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाच होता. जेनेविवच्या केसमुळे इच्छामरणाचा हा विषय मात्र जगभरात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Web Title: Genevieve Lhermitte 56 murdered her five children with kitchen knives in their family home Belgian woman asked euthanasia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.