Maxico: मेक्सिकोत भ्रष्टाचाराविरोधात ‘जेन-झी’ची रस्त्यावर उग्र निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:14 IST2025-11-17T16:09:36+5:302025-11-17T16:14:46+5:30
देशात वाढलेल्या भ्रष्टाचाराविरोधात व गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांवर कडक शिक्षा न होणे या मुद्द्यावरून शनिवारी शहरात हजारोंनी जेन-झी पिढी रस्त्यावर उतरली होती.

Maxico: मेक्सिकोत भ्रष्टाचाराविरोधात ‘जेन-झी’ची रस्त्यावर उग्र निदर्शने
मेक्सिको सिटी : देशात वाढलेल्या भ्रष्टाचाराविरोधात व गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांवर कडक शिक्षा न होणे या मुद्द्यावरून शनिवारी शहरात हजारोंनी जेन-झी पिढी रस्त्यावर उतरली होती. या आंदोलनाला मेक्सिकोतील जुन्या राजकीय पक्षांनी पूर्ण पाठिंबा दिला होता. ही निदर्शने सुरुवातीला शांततेत सुरू होती पण नंतर काही तरुणांनी पोलिसांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. जमावाने पोलिसांवर दगड, पेट्रोल बॉम्ब, काठ्या व चेनने हल्ले केले. यात १०० हून अधिक पोलिस जखमी झाल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी २० आंदोलकांना अटक केली. शनिवारच्या मोर्चात समाजातील सर्व स्तरातील जनतेने सहभाग घेतला होता. माजी अध्यक्ष व्हिन्सेट फॉक्स व मेक्सिकोतील अब्जाधिश रिकार्डो सालिनास यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.
काही दिवसांपूर्वी संघटित गुंडगिरीच्या विरोधात आवाज उठवणारे मिशोआकानचे लोकप्रिय महापौर कार्लोस मांझो यांना ठार मारण्यात आले होते. त्यांच्या समर्थकांनी प्रामुख्याने आंदोलनात भाग घेतला. हे सरकार मरत चालल्याचा आरोप मांझो यांच्या समर्थक ६५ वर्षांच्या रिअल इस्टेट एजंट महिलेने या वेळी केला.
आरोग्यसेवा सुधारणे, नागरी सुरक्षिततेच्याही आंदोलकांच्या मागण्या
आंदोलनात भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा असला तरी देशातील ढासळलेली आरोग्यसेवा पूर्ववत करणे, नागरी सुरक्षितता अधिक कडक करणे अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या. आंदोलनात प्राध्यापक, ड़ॉक्टर, व्यापारी वर्गाचा उल्लेखनीय असा सहभाग होता. संपूर्ण देशात भ्रष्टाचार तर वाढलाच आहे पण खून, हिंसाचार करणारे गुन्हेगार मोकाट फिरत असतानाही सरकार त्यांच्याविरुद्ध काहीच कारवाई करत नाही, असा आरोप आंदोलकांचा होता. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबौम यांची लोकप्रियता वधारलेली आहे. शेनबौम यांनी या आंदोलनाला उजव्या गटांची फूस असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रस्त्यावर गर्दी वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.