नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 09:18 IST2025-11-20T09:17:19+5:302025-11-20T09:18:16+5:30
वेगाने परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून जिल्हाधिकारी धर्मेंद कुमार मिश्र यांनी तातडीने कर्फ्यू लावण्याचे आदेश काढले.

नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
सुप्रौल - नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen Z आंदोलनाचा भडका उडाला आहे. या आंदोलनाचे केंद्र बारा जिल्हा असून रविवारी सेमरा एअरपोर्टबाहेर मोठ्या संख्येने निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांचा राग UML नेता महेश बस्नेत यांच्याविरोधात होता. बस्नेत यांनी याआधीच्या Gen Z आंदोलनात माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे समर्थन केले होते असा त्यांच्यावर आरोप आहे. याच मुद्द्यांवरून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुन्हा रस्त्यावर उतरले आंदोलक
माहितीनुसार, UML नेते शंकर पौडेल आणि महेश बस्नेत रविवारी एका राजकीय कार्यक्रमात भाग घेण्यासाठी बारा जिल्ह्यात येणार होते. परंतु त्यांच्या येण्याची माहिती मिळताच Gen Z आंदोलक पुन्हा रस्त्यावर उतरले. त्यांनी सेमरा एअरपोर्टला घेराव घातला. पाहता पाहता आंदोलकांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली आणि परिस्थिती चिघळली. ज्यातून एअरपोर्टची सुरक्षा तात्काळ वाढवण्यात आली.
वेगाने परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून जिल्हाधिकारी धर्मेंद कुमार मिश्र यांनी तातडीने कर्फ्यू लावण्याचे आदेश काढले. सेमरा एअरपोर्ट आणि त्याच्या आसपास संपूर्ण परिसरात दुपारी १२.३० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत हा कर्फ्यू लावला होता. लोकांचा वाढता विरोध आणि आंदोलन अधिक चिघळू नये यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले होते. कर्फ्यू काळात प्रशासनाने सेमरा एअरपोर्टवरील सर्व उड्डाणे रद्द केली. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज होती.
मागील काही महिन्यांपासून नेपाळमध्ये Gen Z आंदोलन राजकीय अस्थिरतेचे प्रमुख कारण बनले आहे. हे आंदोलन युवकांनी राजकारणात पारदर्शकता, रोजगार, प्रशासनात सुधारणा यासह विविध मागण्यांसाठी सुरू केले. परंतु UML नेते महेश बस्नेत यांनी जुन्या आंदोलनावेळी सत्ताधारी पक्षाला साथ दिली होती. त्यामुळे युवकांमध्ये नाराजी पसरली होती. सध्या जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कर्फ्यू काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि लावलेल्या निर्बंधांचे उल्लंघन कुणी करू नये याची काळजी प्रशासन घेत आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर कर्फ्यू आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे.