नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 12:21 IST2025-09-30T12:21:36+5:302025-09-30T12:21:49+5:30
Gen Z Protest in Madagascar: आंदोलनात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी!

नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
Gen Z Protest in Madagascar: नेपाळनंतर आता माडागास्करमध्ये सरकारविरोधात Gen Z रस्त्यावर उतरले आहेत. वीज आणि पाण्याच्या मुद्द्यावर देशभरात मागील गुरुवारपासून आंदोलन पेटले आहे. सुरुवातीला शांततेत सुरू झालेल्या आंदोलनाने अचानक हिंसक वळण घेतले. या आंदोलनात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जखमी झाले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी सरकार बरखास्त केले आहे.
निम्म्याहून अधिक लोक दारिद्र्यरेषेखाली
माडागास्कर हा आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यालगत वसलेला 3.1 कोटी लोकसंख्येचा बेटदेश आहे. गेल्या काही वर्षांत दारिद्र्य झपाट्याने वाढले असून, वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये येथील 75% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. देशातील नागरिकांच्या वीज आणि पाण्यासारख्या मुलभूत गरजाही भागवण्यात सरकार अयशस्वी ठरली आहे. याविरोधात गेल्या गुरुवारपासून Gen-Z रस्त्यावर उतरले आहेत.
सरकार बरखास्त
या जनआंदोलनामुळे राष्ट्रपती आंद्रि राजोएलिना यांनी सोमवारी मोठा निर्णय घेतला. त्यांनी पंतप्रधान क्रिश्चियन न्त्साय आणि संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त केले. मात्र, नवी सरकार स्थापन होईपर्यंत ते अंतरिम स्वरुपात पदावर कायम राहतील. येत्या काही दिवसांत नवीन पंतप्रधानांची नियुक्ती होऊ शकते.
राष्ट्रपतींची प्रतिक्रिया
राजोएलिना यांनी टीव्हीवरील भाषणात आंदोलनकर्त्यांना उद्देशून म्हटले की, “आपल्या मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. वीज-पाणी समस्यांमुळे निर्माण झालेल्या अडचणींची मला जाणीव आहे. सरकारमधील काही सदस्यांनी अपेक्षित कामगिरी केली नाही, त्याबद्दल मी माफी मागतो. ”
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
आंदोलनाची तीव्रता
हजारो तरुणांनी राजधानी अंतानानारिवो आणि इतर प्रमुख शहरांमध्ये मोर्चे काढले. रस्त्यावर टायर जाळणे, घोषणाबाजी, पोस्टर आणि टी-शर्टद्वारे सरकारविरोधात निषेध नोंदवला. अंतानानारिवोची नवीन केबल कार सार्वजनिक परिवहन प्रणालीसह काही स्थानके जाळून टाकली. तसेच, काही नेत्यांच्या घरांवरही हल्ले झाले. परिस्थिती बिघडल्यामुळे सरकारने अंतानानारिवोसह इतर शहरांत कर्फ्यू लागू केला आहे.