गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:06 IST2025-10-06T12:05:04+5:302025-10-06T12:06:36+5:30
गाझा पट्टीतील युद्धविराम योजनेवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात थेट फोनवरच तुफान वाद झाल्याचे म्हटले जात आहे.

गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
गाझा पट्टीतील युद्धविराम योजनेवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात थेट फोनवरच तुफान वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांनी सादर केलेल्या २० कलमी शांतता प्रस्तावाच्या काही अटींवर हमासने सहमती दर्शवल्यानंतरही नेतन्याहूनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने ट्रम्प कमालीचे संतापले. सूत्रांनुसार, ट्रम्प यांनी नेतन्याहूंना स्पष्ट शब्दांत सुनावले. यावेळी त्यांनी काही अपशब्द वापरल्याचे देखील म्हटले जात आहे.
ट्रम्प यांचा क्रेडिटचा खेळ आणि हमासची सहमती
हमासने ओलिसांना सोडण्यास तयारी दर्शवली आहे, परंतु त्या बदल्यात इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांना सोडावे आणि गाझामधून आपले सैन्य तात्काळ मागे घ्यावे, अशी अट ठेवली आहे. ट्रम्प यांनी हमासच्या या सहमतीमुळे चर्चेचा मार्ग खुला झाल्याचे सांगत, इस्रायलला गाझावर तातडीने बॉम्बहल्ला थांबवण्याचे आवाहन केले. मात्र, हमासच्या अटी स्वीकारण्यावर नेतन्याहू यांनी कोणताही समाधानकारक प्रतिसाद न दिल्याने ट्रम्प संतापले.
ॲक्सिओसच्या रिपोर्टनुसार, हमासची सहमती ही काही खूश होण्यासारखी गोष्ट नाही, असे नेतन्याहूंनी म्हटल्यावर ट्रम्प भडकले आणि म्हणाले, "तुम्ही इतके नकारात्मक कसे असू शकता? हा एक विजय आहे!"
डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीत गाझामध्ये युद्धविराम व्हावा आणि त्याचे श्रेय आपल्याला मिळावे, अशी त्यांची तीव्र इच्छा आहे. अनेक युद्धे थांबवण्याचा दावा त्यांनी यापूर्वीही केला आहे आणि त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा, अशी त्यांची महत्त्वाकांक्षा असल्याचे बोलले जाते.
पहिल्या टप्प्यात एकमत, पण शाब्दिक धुमश्चक्री
हमासने ठेवलेल्या अटी निरुपयोगी असल्याचे नेतन्याहू मानत असले तरी, ट्रम्प यांच्या मते हमासच्या सहमतीमुळे संवादाची शक्यता निर्माण झाली आहे आणि ती दुर्लक्षित करू नये. ट्रम्प यांनी हमासला वेळेत शांतता करारावर सहमत न झाल्यास गाझामध्ये रक्ताचे पाट वाहतील, अशी धमकीही दिली आहे.या वादानंतरही दोन्ही नेत्यांमध्ये सहमतीचे वातावरण तयार झाले.
नेतन्याहूंचे समर्थन
वादानंतर नेतन्याहूंनी सार्वजनिकरीत्या ट्रम्प यांची स्तुती केली आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी व्हाईट हाऊस सकारात्मक प्रयत्न करत असल्याचे म्हटले. माहितीनुसार, इस्रायल देखील पहिल्या टप्प्यात गाझामधील सैन्य कमी करण्यास तयार झाला आहे.
ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्याच्या आणि ओलिसांना मुक्त करण्याच्या त्यांच्या योजनेचा पहिला टप्पा एका आठवड्यात पूर्ण होईल. अंतिम निर्णयांवर काम करण्यासाठी तांत्रिक पथके सोमवारी इजिप्तमध्ये पुन्हा भेटणार आहेत आणि ट्रम्प या संपूर्ण संघर्षावर सतत लक्ष ठेवणार आहेत.