युद्धाच्या छायेत गॅसपुरवठा विस्कळीत; दरामध्ये वाढ, कतारने उत्पादन थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 04:50 IST2026-03-04T04:50:15+5:302026-03-04T04:50:30+5:30

भारत, युरोपला इंधन तुटवड्याची झळ; भारत मोठा खरेदीदार

Gas supply disrupted in shadow of war; price hike, Qatar halts production | युद्धाच्या छायेत गॅसपुरवठा विस्कळीत; दरामध्ये वाढ, कतारने उत्पादन थांबविले

युद्धाच्या छायेत गॅसपुरवठा विस्कळीत; दरामध्ये वाढ, कतारने उत्पादन थांबविले

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :  अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगातील आघाडीचा गॅस उत्पादक कतारने द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) उत्पादन तात्पुरते थांबविल्याने भारत आणि युरोपमध्ये इंधन तुटवड्याची भीती वाढली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून युरोपमधील गॅस दर ३० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले की, भारतातील प्रमुख आयातदार पेट्रोनेट एलएनजी लि. यांनी गेल (इंडिया) तसेच इतर कंपन्यांना १० ते ३० टक्क्यांपर्यंत पुरवठा कपातीची माहिती दिली आहे. गेल आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांनीही ग्राहकांना गॅसकपातीबाबत कळविले आहे.
भारत हा जगातील चौथा सर्वांत मोठा एलएनजी खरेदीदार असून, आयातीसाठी मोठ्या प्रमाणावर मध्यपूर्वेवर अवलंबून आहे. अबूधाबी नॅशनल ऑइल कंपनीचा भारत हा सर्वांत मोठा ग्राहक आहे, तर कतारकडून एलएनजी खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तुटवडा भरून काढण्यासाठी आयओसी, गेल आणि पेट्रोनेट स्पॉट टेंडर काढण्याची तयारी करीत आहेत; मात्र स्पॉट दर, वाहतूक आणि विमा खर्चात मोठी वाढ झाली आहे.

उत्पादन केले स्थगित
कतार एनर्जीने ड्रोन हल्ल्यानंतर सोमवारी उत्पादन स्थगित केले. मेसाईद औद्योगिक शहरातील वीज प्रकल्पावरील पाण्याच्या टाकीवर तसेच रास लाफान येथील ऊर्जा प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 
होर्मुझ सामुद्रधुनीतही तणाव वाढल्याने तेल आणि गॅस दरात वाढ झाली आहे. जागतिक एलएनजी बाजारातील सुमारे २० टक्के निर्यात कतारकडून होते. पुरवठा घटल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला असून, दर झपाट्याने वाढत आहेत.
युरोपमध्ये डच टीटीएफ नैसर्गिक वायू करारात ३३ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदली गेली, तर सोमवारी  दरामध्ये जवळपास ४० टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. संघर्ष दीर्घकाळ चालण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्याचे ऊर्जा बाजारावर दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

Web Title : युद्ध के साये में गैस आपूर्ति बाधित; कीमतें बढ़ीं, कतर ने उत्पादन रोका

Web Summary : बढ़ते तनाव के बीच, प्रमुख गैस उत्पादक कतर ने एलएनजी उत्पादन अस्थायी रूप से रोक दिया है, जिससे भारत और यूरोप में ईंधन की कमी की आशंका बढ़ गई है। यूरोप में गैस की कीमतें बढ़ गई हैं। भारत के आयातकों को आपूर्ति में कटौती का सामना करना पड़ रहा है, जिससे वैकल्पिक स्रोतों की तलाश हो रही है।

Web Title : Gas Supply Disrupted Amid Conflict; Prices Rise, Qatar Halts Production

Web Summary : Amidst escalating tensions, Qatar, a major gas producer, has temporarily halted LNG production, raising concerns about fuel shortages in India and Europe. Gas prices in Europe have surged. India's importers face supply cuts, prompting a search for alternative sources.