समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 15:33 IST2025-07-13T15:32:38+5:302025-07-13T15:33:24+5:30
Crime News: कुटुंबीयांसह समुद्र किनारी फिरत असलेल्या एका व्यक्तीला तिथे पडलेल्या गिफ्ट बॉक्समध्ये असं काही सापडलं की त्याला तो बॉक्स उघडून पाहिल्यावर धक्काच बसला. त्यानंतर त्याला थेट पोलीस ठाण्यातच धाव घ्यावी लागली.

समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?
रस्त्यावरून जात असताना, कुठेतरी फिरत असताना एखाद्या नशीबवान व्यक्तीला दुर्मीळ मौल्यवान वस्तू किंवा एखादा दागिना, रोख रक्कम सापडल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र कुटुंबीयांसह समुद्र किनारी फिरत असलेल्या एका व्यक्तीला तिथे पडलेल्या गिफ्ट बॉक्समध्ये असं काही सापडलं की त्याला तो बॉक्स उघडून पाहिल्यावर धक्काच बसला. त्यानंतर त्याला थेट पोलीस ठाण्यातच धाव घ्यावी लागली.
ही घटना अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील असून, तिथे आपल्या पत्नी आणि मुलांसह समुद्र किनारी फिरत असलेल्या एका व्यक्तीला खाली पडलेला एक गिफ्ट बॉक्स सापडला. त्यानंतर या व्यक्तीने उत्सुकतेपोटी हा बॉक्स उघडून पाहिला असता त्यात त्याला माणसाच्या पायाचा एक कापलेला अंगठा असल्याचे आढळून आले. तो अंगठा पाहून त्याला धक्का बसला. त्याने तो बॉक्स तिथेच फेकून पोलीस ठाण्यात जाऊन सदर प्रकाराची माहिती दिली.
केविन इनिंग असं हा बॉक्स सापडलेल्या व्यक्तीचं नाव असून, त्याने या प्रकरणाच्या तपासासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्याने सांगितले की, कुटुंबीयांसोबत फिरत असताना समुद्र किनाऱ्यावर एक छोटासा गिफ्ट बॉक्स मला दिसला. तो हिरव्या कपड्यात गुंडाळलेला होता. तसेच तो बॉक्स पिवळ्या धाग्याने बांधलेला होता. कुणीतरी विसरलेला गिफ्ट बॉक्स असेल म्हणून तो मी उघडून पाहिला. तेव्हा मला त्यामध्ये कापलेला पायाचा अंगठा आढळून आला. तो पाहून मी सुरुवातीला खूप घाबरलो. मात्र नंतर मी याची माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र हा अंगठा कुणाचा आहे, याची माहिती पोलिसांना अद्याप मिळालेली नाही.