Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 18:23 IST2026-01-08T18:21:55+5:302026-01-08T18:23:54+5:30
Dipu Chandra Das Murder: बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी घडलेल्या त्या अंगावर शहारे आणणाऱ्या क्रूर घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यासिन अराफत असे या नराधमाचे नाव असून, तो एक माजी शिक्षक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी झालेल्या दिपू चंद्र दास यांच्या अमिष आणि निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. यासिन अराफत असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो एक माजी शिक्षक आहे. दास यांची 'ईश्वरनिंदे'च्या खोट्या आरोपाखाली जमावाकडून हत्या करण्यात आली होती, ज्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले.
२७ वर्षीय दिपू चंद्र दास हे एका कारखान्यात कामाला होते. १८ डिसेंबर रोजी त्यांच्यावर पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला. कारखान्यातील पर्यवेक्षकांनी त्यांना जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांना कामाच्या ठिकाणाहून फरफटत बाहेर काढून कट्टरपंथी स्थानिक इस्लामी जमावाच्या स्वाधीन करण्यात आले. हिंसक जमावाने दिपू चंद्र दास यांना बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता, जमावाने त्यांचा मृतदेह एका झाडाला लटकवला आणि त्याला आग लावून दिली. या अमानवीय कृत्यात दास यांच्यासोबत काम करणाऱ्या काही सहकाऱ्यांचाही समावेश असल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी शिक्षक असलेल्या यासिन अराफत या घटनेचा मुख्य सूत्रधार होता. अराफतने आपल्या सामाजिक प्रभावाचा वापर करून स्थानिकांना भडकावले आणि अल्पावधीत मोठा हिंसक जमाव गोळा केला. केवळ चिथावणी देऊन तो थांबला नाही, तर त्याने स्वतः दास यांना ओढत चौकात नेले आणि त्यांना फासावर लटकवून जाळण्यात पुढाकार घेतला. हत्येनंतर अराफत फरार झाला. मात्र, गुरुवारी पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १० जणांना अटक करण्यात आली आहे.
अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य करण्याचे सत्र सुरूच
बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपासून हिंदू समुदायाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच एका हिंदू पत्रकाराचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दिपू चंद्र दास यांच्या हत्येचा भारतासह अनेक देशांनी तीव्र निषेध केला असून, बांगलादेश सरकारने अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.