इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक आता करणार नोकरी, प्रसिद्ध कंपनीत या पदावर करणार काम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:37 IST2025-07-09T13:36:42+5:302025-07-09T13:37:11+5:30

Rishi Sunak News: इंग्लंडचे माजी पंतप्रधान आणि प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई असलेले ऋषी सुनक हे आता प्रसिद्ध इन्वेस्टमेंट बँक गोल्डमॅन सॅक्स ग्रुप इंक कंपनीमध्ये वरिष्ठ सल्लागार या पदावर काम करणार आहेत. 

Former Prime Minister of England Rishi Sunak will now take up a job, will work in this position in a famous company | इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक आता करणार नोकरी, प्रसिद्ध कंपनीत या पदावर करणार काम  

इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक आता करणार नोकरी, प्रसिद्ध कंपनीत या पदावर करणार काम  

गतवर्षी झालेल्या संसदीय निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर ऋषी सुनक यांना इंग्लंडच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ऋषी सुनक हे राजकारणापासून दूर राहून विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसले होते. तसेच मध्यंतरी ते भारताच्या दौऱ्यावरही आले होते. मात्र आता सुनक यांनी नवी नोकरी शोधली आहे. प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई असलेले ऋषी सुनक हे आता प्रसिद्ध इन्वेस्टमेंट बँक गोल्डमॅन सॅक्स ग्रुप इंक कंपनीमध्ये वरिष्ठ सल्लागार या पदावर काम करणार आहेत.

गोल्डमॅन सॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हीड सोलोमन यांनी स्वत: याची माहिती दिली आहे. डेव्हिड सोलोमन यांनी सांगितले की, ऋषी सुनक हे कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनासोबत मिळून जागतिक पातळीवरील ग्राहकांना सल्ला देतील. विशेषकरून भू-राजकीय आणि आर्थिक बाबींवर ते आपला दृष्टीकोन आणि अनुभवांची ग्राहकांसोबत देवाण-घेवाण करतील.

उल्लेखनीय बाब म्हणजे इंग्लंडच्या राजकारणात स्थिरस्थावर होण्यापूर्वी ऋषी सुनक हे न्यूयॉर्कमधील गोल्डमॅन सॅक्स कंपनीमध्ये काम करत होते. या कंपनीशी त्यांचं जुनं नातं असून, सन २००० च्या सुरुवातीला त्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर २०१५ साली राजकारणात येण्यापूर्वी सुनक यांनी एका इंटरनॅशन इन्वेस्टमेंट फर्मची स्थापना केली होती. ही कंपनी जगभरातील कंपन्यांसोबत मिळून आर्थिक गुंतवणुकीच्या क्षेत्रात काम करत होती.

दरम्यान, ऋषी सुनक यांनी २०१५ मध्ये खासदार म्हणून संसद सदस्य म्हणून ब्रिटनच्या राजकारणात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी २०२० ते जुलै २०२२ या काळात त्यांनी ब्रिटनचं वित्तमंत्रिपद सांभाळलं होतं. तर ऑक्टोबर २०२२ ते जुलै २०२४ या काळात ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली होती. दरम्यान, २०२४ साली झालेल्या सार्वत्रिक निवणुकीत सुनक यांच्या पक्षाचा पराभव झाला असला तरी ते खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच आपण खासदार म्हणून कार्यरत राहू असे त्यांनी सांगितले होते. 

Web Title: Former Prime Minister of England Rishi Sunak will now take up a job, will work in this position in a famous company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.