चीनचे माजी मंत्री कायमचे ‘गायब’ होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 07:50 IST2025-10-07T07:50:37+5:302025-10-07T07:50:44+5:30
चीनचे माजी मंत्री तांग रेनजियन यांनी भ्रष्टाचाराच्या मार्गानं अब्जावधी रुपयांची माया कमावल्याचा आरोप आहे. कोर्टातही हे आरोप सिद्ध झाले आहेत.

चीनचे माजी मंत्री कायमचे ‘गायब’ होणार!
अनेक प्रसिद्ध व्यक्ती, मंत्री चीनमधून अचानक गायब होण्याच्या अनेक कहाण्या यापूर्वी आपण ऐकल्या आहेत. ज्या-ज्या व्यक्ती सरकारला त्रासदायक ठरू शकतील, अशी शक्यता होती, त्यांतील अनेक लोक अचानक गायब झाले. आजतागायत ते सापडले नाहीत. त्यांचं नेमकं काय झालं हे कोणालाच माहीत नाही. भ्रष्टाचाराच्या कारणावरूनही चीनमध्ये अनेकांना फासावर लटकावण्यात आलं आहे. त्याच यादीत आता चीनचे माजी कृषीमंत्री तांग रेनजियन यांचा समावेश झाला आहे. लाचखोरीच्या आरोपावरून त्यांना मृत्युदंड सुनावण्यात आला आहे. ते आता अधिकृतरित्या कायमचे ‘गायब’ होतील.
चीनचे माजी मंत्री तांग रेनजियन यांनी भ्रष्टाचाराच्या मार्गानं अब्जावधी रुपयांची माया कमावल्याचा आरोप आहे. कोर्टातही हे आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांची फाशी अटळ आहे. त्यांच्यावर ३८ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची (सुमारे ४.५ अब्ज रुपये) लाच घेतल्याचा आरोप आहे. कोर्टानं त्यांना आयुष्यभरासाठी राजकीय पदांपासून वंचित करण्याचा आणि त्यांची खासगी संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला आहे. तांग यांनी २००७ ते २०२४ दरम्यान आपल्या पदाचा गैरवापर करत इतरांकडून २६८ दशलक्ष युआनची लाच घेतली होती.
कोर्टानं आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, तांग यांच्या जप्त केलेल्या संपत्तीमधून मिळणारे सर्व पैसे राष्ट्रीय मदतनिधीत जमा केले जातील. तांग यांनी आपल्या कार्यकाळात व्यापार, प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्टिंग आणि नोकरी समायोजनात अनेक जणांना नियमाच्या बाहेर जाऊन ‘मदत’ केली. या मदतीच्या बदल्यात त्यांनी २६८ दशलक्ष युआनच्या वस्तू भेट म्हणून घेतल्या. गेल्या बऱ्याच काळापासून तांग यांची चौकशी सुरू होती. त्यांच्या भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे बाहेर येत होती. अगोदर तर त्यांनी या सर्व घोटाळ्यांबाबत कानांवर हात ठेवले होते. नंतर मात्र तांग यांनी आपला अपराध कोर्टात मान्य केला.
न्यायालयानं गुन्ह्यांबाबत त्यांना जबाबदार धरले आहे. त्यांच्या अपराधांमुळे राज्य आणि जनतेला आजवर खूप नुकसान सोसावं लागलं असून, त्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे. चीनच्या या माजी मंत्र्याचा त्यातल्या त्यात ‘प्रामाणिकपणा’ म्हणजे त्यांनी अपराध मान्य करतानाच बेकायदेशीर संपत्ती परतही केली. यामुळे कोर्टानंही त्यांच्यावर थोडी मेहेरबानी दाखवत अंतिम निर्णयात त्यांना थोडी सवलत दिली आहे. तांग यांनी आपला गुन्हा कबूल करून बेनामी संपत्तीही परत केल्यानं त्यांच्या फाशीचा निर्णय दोन वर्षांनी लागू होईल असे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा २५ जुलैला कोर्टात झाली.
भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारनं सुरुवातीपासूनच स्पष्ट केले आहे. त्यानुसार अनेकजणांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. चीनमध्ये २०१२ साली अध्यक्ष शी जिनपिंग सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारविरोधी मोहीम सुरू झाली. अनेक सरकारी अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं. त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर खटलेही दाखल करण्यात आले. या मोहिमेत १० लाखांहून अधिक अधिकाऱ्यांना शिक्षा झाली. यात अनेक लष्करी अधिकारीही सामील होते. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.