बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 18:43 IST2025-07-02T18:42:48+5:302025-07-02T18:43:21+5:30
ढाका येथील एका विशेष कोर्टाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ६ महिन्यांची जेलची शिक्षा सुनावली आहे.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
ढाका येथील एका विशेष कोर्टाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ६ महिन्यांची जेलची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा झाली आहे. हा निर्णय आयसीटी-१ (International Crimes Tribunal - ICT) या तीन न्यायाधीशांच्या बेंचने दिला आहे.
कोर्टाने सांगितलं की, शेख हसीनांनी अशी काही विधानं केली ज्यामुळे न्यायालयाचा अनादर झाला आणि न्यायव्यवस्थेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
नेमकं प्रकरण काय?
बांगलादेशी मीडियानुसार, हे प्रकरण गेल्या वर्षी ऑक्टोबरमधील आहे. त्यावेळी एक फोन कॉल लीक झाला होता. या ऑडिओ क्लिपमध्ये शेख हसीना यांचाच आवाज असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यात त्या म्हणत होत्या की, त्यांच्यावर २२७ केसेस दाखल आहेत, त्यामुळे त्यांना २२७ लोकांना मारण्याचा परवानाच मिळाला आहे. त्यांच्या याच वक्तव्याला कोर्टाने न्यायालयाचा अवमान मानलं.
आयसीटी हे बांगलादेशच्या १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धातील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी बनवलेलं विशेष कोर्ट आहे. असं मानलं जातंय की, मोहम्मद युनूस हे या कोर्टाचा वापर शेख हसीना आणि त्यांच्या पक्षाचं राजकारण कायमचं संपवण्यासाठी करत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शेख हसीनांचं सरकार पडलं होतं आणि त्यानंतर मोहम्मद युनूस हे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनले आहेत.
शेख हसीना आणि मोहम्मद युनूस यांचा जुना वाद!
शेख हसीना आणि मोहम्मद युनूस यांच्यातील जुना वाद काही लपून राहिलेला नाही. युनूस यांना जेव्हा 'मायक्रोफायनान्स' मॉडेलसाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आणि ते जगात प्रसिद्ध झाले, तेव्हा शेख हसीनांना ते आवडलं नव्हतं. त्यांनी युनूस यांच्यावर करचोरी आणि गैरव्यवहाराचे आरोप केले. इतकंच नाही, तर त्यांना 'ग्रामीण बँक'मधून काढण्याचाही प्रयत्न केला. यावर युनूस यांनीही अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवरून बांगलादेश सरकारवर टीका केली, ज्यामुळे त्यांचे संबंध आणखी खराब झाले.
कोण आहेत शेख हसीना?
शेख हसीना या बांगलादेशच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावशाली राजकारणी मानल्या जातात. त्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि "अवामी लीग" या पक्षाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. त्यांचं राजकीय जीवन बांगलादेशच्या स्वातंत्र्याशी, लोकशाहीशी आणि संघर्षांशी खूप जवळून जोडलेलं आहे. शेख हसीना यांचा जन्म २८ सप्टेंबर १९४७ रोजी बांगलादेशातील तुंगीपाडा येथे झाला. त्या बांगलादेशचे संस्थापक आणि पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत. १९७५ मध्ये जेव्हा शेख मुजीब आणि त्यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्यांना एका लष्करी उठावात मारण्यात आलं, तेव्हा शेख हसीना आणि त्यांची बहीण परदेशात असल्याने वाचल्या होत्या.