"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:35 IST2025-06-17T17:35:10+5:302025-06-17T17:35:35+5:30
इस्त्रायलच्या हल्ल्याचा हेतू इराणी जनतेला त्रास देण्याचा नाही कारण त्यांचे उद्दिष्ट इथल्या सरकारच्या धोक्याला दूर करणे आहे असं राज शाह यांनी म्हटलं.

"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
Iran-Israel Conflict: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. आता इराणमध्ये अंतर्गतच काही लोक उघडपणे इस्त्रायलचे समर्थन करत आहेत. पूर्वी इराणच्या सत्तेवर राज करणाऱ्या राजाचा मुलगा सध्याचे इराणमधील सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्याविरोधात आवाज उचलत आहे. या व्यक्तीचे नाव आहे रजा शाह पहलवी. ज्यांच्या घराण्याने १९७९ पर्यंत इराणवर सत्ता भोगली. आता त्याच घराण्याने खामेनेई यांच्याविरोधात एल्गार केला आहे.
इराणमध्ये सत्ता बदलाची वेळ आलीय
राज शाह पहलवी यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, इराणमध्ये सत्तापालट करण्याची वेळ आली आहे. आमची वेळ आली आहे. हे युद्ध इराणी लोकांचे नाही तर खामेनेई यांचे आहे. युद्धाचा शेवट काहीही होऊ शकतो. जे सरकार कमकुवत करेल. ४० वर्षाहून अधिक काळ मी इराणच्या लोकशाहीसाठी लढत आहे असं त्यांनी सांगितले. राज शाह यांनी त्यांच्या एक्सवर पोस्ट करून इराणमध्ये सत्तापालट करण्यासाठी जगाकडे मागणी केली आहे.
तसेच इस्त्रायलच्या हल्ल्याचा हेतू इराणी जनतेला त्रास देण्याचा नाही कारण त्यांचे उद्दिष्ट इथल्या सरकारच्या धोक्याला दूर करणे आहे. इस्त्रायली हल्ल्यामुळे इराणचे सरकार कमकुवत होते. त्यानंतर इराणमध्ये सत्ता बदल करण्याचा मार्ग खुला होईल असंही शाह पहलवी यांनी म्हटलं आहे. इस्त्रायल आणि इराणचे युद्ध आता आणखी तीव्र झाले आहे. ज्यामुळे भारत, अमेरिकेसह अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना तिथून परतायला सांगितले आहे. इस्त्रायली सैन्य सातत्याने तेहरानवर हल्ला करत आहे. इराणनेही तेल अवीवमधील इस्त्रायली गुप्तचर यंत्रणेचे मुख्यालय हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केले आहे.
For more than 40 years I have fought for one thing: democracy in Iran.
— Reza Pahlavi (@PahlaviReza) June 15, 2025
Now is our moment. pic.twitter.com/OaPjDsMbA2
सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
दरम्यान, इराण इस्रायल मधील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर वळणांवर पोहोचत असून दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. सोमवारी संध्याकाळी इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हवाई हल्ला केला. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर बॉम्ब टाकले. हल्ल्याच्या वेळी एक महिला अँकर लाइव्ह शो करत होती. सुदैवाने ती या हल्ल्यात बचावली.