स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 07:04 IST2025-04-24T07:04:31+5:302025-04-24T07:04:46+5:30
कोपनहेगन इथे रेस्टॉरंट चालवत असलेले हॅनसन आणि हीलबाइक यांनी निसर्गाच्या जवळ जायच्या प्रेरणेतून २०१६मध्ये स्टेडसन हे रिसॉर्ट सुरू केलं.

स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
ब्रेक हवा, विश्रांती हवी, शांत झोप काढायची आहे किंवा अगदी शांतपणे काम करायचं आहे म्हणून… अशा अनेक कारणांसाठी माणसं छान छान ‘गेट अवे’ पर्यायांच्या शोधात असतात. पर्यटनाला जायचा विचार नसेल तरी इंटरनेटवर स्क्रोल करताना निसर्गाच्या सान्निध्यात, शांत, निवांत रिसॉर्ट्स, शहरी कलकलाटापासून दूर असलेले कॉटेजेस किंवा होम स्टे असे पर्याय भुरळ घालतात. असंच अनेकांना भुरळ घालणारं स्वीडनमधलं एक फॉरेस्ट रिसॉर्ट. एका डॅनिश जोडप्याने ते सुरू केलं होतं. गेल्या काही वर्षात त्या रिसॉर्टने चांगलीच लोकप्रियताही मिळवली होती.
स्टेडसान्स नावाचं हे फॉरेस्ट रिसॉर्ट सध्या चांगलंच चर्चेत आहे. पण, ही चर्चा काही चांगल्या कारणास्तव नाही. पर्यटकांना नेचर रिट्रीटची, शांत, निवांत जगण्याची लालूच दाखवणारं रिसॉर्ट सुरू करणारं ते डॅनिश जोडपं स्वीडन सरकारला खड्ड्यात घालून पसार झालं. झालं ते झालं, वर सुमारे १५८ पिंप भरून ‘ह्यूमन वेस्ट’ अर्थात मानवी विष्ठा मागे ठेवून हे जोडपं परागंदा झाल्याचं समोर आलं. त्यामुळे त्यांचा सर्वत्र सुरू झालेला शोध नुकताच ग्वाटेमाला इथे संपला आहे.
फेल्मिंग हॅनसन आणि मीट हीलबाइक अशी या दोघांची नावं आहेत. दक्षिण स्वीडनमधील हॉलंडमध्ये स्टेडसन नावाचं पर्यावरण पूरक रिसॉर्ट हे दोघे चालवत होते. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्याकडच्या प्राण्यांना मोकळं सोडून, १५८ पिंप मानवी विष्ठेची विल्हेवाट न लावता शिवाय सरकारला द्यायचा तब्बल ४,७०,००० पौंडांचा कर चुकवून हॅनसन आणि हीलबाइक यांनी स्वीडनमधून पळ काढला.
कोपनहेगन इथे रेस्टॉरंट चालवत असलेले हॅनसन आणि हीलबाइक यांनी निसर्गाच्या जवळ जायच्या प्रेरणेतून २०१६मध्ये स्टेडसन हे रिसॉर्ट सुरू केलं. एका शांत जंगलात वसलेल्या १६ केबिन्ससाठी हे इको रिसॉर्ट प्रसिद्ध होतं. एके काळी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि रिव्ह्यूअर्सनी ‘लक्झुरिअस नेचर एस्केप’ म्हणून हे रिसॉर्ट डोक्यावर घेतलं होतं. त्यामुळे पर्यटकांचा त्याकडे असलेला ओघही प्रचंड होता. मात्र, कालांतराने व्यवसायात आर्थिक तंगी आली. स्वीडिश सरकारला द्यायच्या करापोटी ४,७०,००० पौंडांचं ओझं डोक्यावर आलं आणि मार्चमध्ये हे रिसॉर्ट दिवाळखोरीत निघाल्याचं जाहीर करण्यात आलं. हॅनसन आणि हीलबाइक यांनी देश सोडून जाताना अनेक गंभीर गोष्टी केल्याचं तपासातून समोर आलं. मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट न लावता ती जमिनीत पुरण्यात आली होती. सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय जंगलात सोडण्यात आलं होतं.
बदकं आणि इतर प्राण्यांना तर बेवारस सोडून त्या दोघांनी पळ काढल्याचं स्पष्ट झालं आहे. एवढं सगळं झाल्यानंतरही हेनसन याने स्वीडिश टॅक्स ऑफीस हे ‘नार्सिसिस्टिक’ असल्याचं म्हटलं आहे. हेनसन आणि हीलबाइक यांनी त्यांच्या वेबसाइटवर आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. ‘आम्हाला पर्यटकांसाठी एक सुंदर जागा निर्माण करायची होती, पण तिथली कर प्रणाली अत्यंत जाचक असल्यामुळे आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही, स्वीडनमध्ये जगातील सर्वाधिक कर घेतला जात असल्यामुळे तिथे व्यवसाय करणं अशक्य आहे,’ असं या जोडप्याने म्हटलं आहे. दरम्यान, ग्वाटेमाला इथे या जोडप्याने नवीन हॉटेल सुरू केल्याच्या बातम्या आहेत.