Canada Indian Man Deported:कॅनडातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या नातवाला भेटण्यासाठी तात्पुरत्या व्हिसावर कॅनडाला गेलेल्या एका ५१ वर्षीय भारतीय नागरिकाला शालेय मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. जगजीत सिंह असे या व्यक्तीचे नाव असून, न्यायालयाने त्याला शिक्षा म्हणून तातडीने मायदेशी पाठवण्याचे आणि भविष्यात कॅनडात पुन्हा कधीही प्रवेश न करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. सप्टेंबर महिन्यात ही घटना कॅनडातील ओंटारियो प्रांतात एका हायस्कूलजवळ घडली होती.
जगजीत सिंह जुलै महिन्यात आपल्या नवजात नातवाला भेटण्यासाठी तात्पुरत्या व्हिसावर कॅनडातील ओंटारियो येथे आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडात आल्यानंतर जगजीत सिंह सरनिया परिसरातील एका स्थानिक हायस्कूलच्या बाहेर असलेल्या स्मोकिंग एरियामध्ये वारंवार जात असे. ८ ते ११ सप्टेंबर या दरम्यान त्याने याच ठिकाणी अनेकदा शालेय मुलींचा कथित लैंगिक छळ केला आणि त्यांना त्रास दिला.
कॅनेडियन माध्यमांच्या वृत्तानुसार, सिंहने मुलींशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत फोटो काढण्याची मागणी केली आणि त्यांच्याशी अंमली पदार्थ व दारू याबद्दल चर्चा केली. तक्रार करणाऱ्या एका मुलीने पोलिसांना सांगितले की, सुरुवातीला मुलींनी फोटो काढण्यास नकार दिला. पण तो तिथून निघून जाईल या आशेने त्या फोटो काढण्यास तयार झाल्या. मात्र, फोटो काढल्यानंतर त्याने एका मुलीच्या गळ्यात हात टाकण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली आणि तिने त्याला दूर ढकलले. सिंह शाळेतून बाहेर पडल्यानंतरही मुलींचा पाठलाग करत असे.
अटक, जामीन आणि पुन्हा अटक
या घटनेनंतर १६ सप्टेंबर रोजी सिंहला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचाराच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांनी त्याला जामीन मिळाला. मात्र, त्याच दिवशी त्याच्याविरोधात आणखी एका अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केल्याने त्याला तातडीने पुन्हा अटक करण्यात आली. दुसऱ्यांदा जामीन मिळाल्यानंतरही, इंग्रजी भाषेच्या अडचणीमुळे आणि त्यावेळी दुभाषी उपलब्ध नसल्यामुळे त्याला आणखी एक रात्र कोठडीत काढावी लागली.
न्यायालयाने सुनावली शिक्षा
१९ सप्टेंबर रोजी सरनिया कोर्टरूममध्ये जगजीत सिंह याने गुन्हेगारी स्वरूपाचा त्रास दिल्याच्या गुन्ह्यासाठी दोषी असल्याचे मान्य केले. यावेळी न्यायमूर्ती क्रिस्टा लिन लेस्झिंस्की यांनी स्पष्टपणे असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही असे सांगितले. सिंहच्या वकिलाने न्यायाधीशांना सांगितले की, त्याच्याकडे ३० डिसेंबरचे भारताचे परतीचे तिकीट आहे. मात्र, न्यायाधीशांनी त्याला तातडीने परत पाठवण्याचे आणि भविष्यात कॅनडामध्ये त्याच्या प्रवेशावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचे आदेश दिले. याव्यतिरिक्त, त्याला तीन वर्षांसाठी प्रोबेशनवर ठेवण्यात आले आहे, ज्याअंतर्गत त्याला कोणत्याही मुलीशी बोलण्यास, त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा शाळेजवळ जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.