भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 20:09 IST2025-08-22T19:57:39+5:302025-08-22T20:09:03+5:30
अमेरिकेतील राजकीय गोंधळाच्या दरम्यान, एफबीआयने माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर छापा टाकला. ही कारवाई त्यांच्या 'द रूम व्हेअर इट हॅपन्ड' या पुस्तकातील गोपनीय माहितीच्या उघडकीस आणण्याशी संबंधित आहे.

भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
अमेरिकेत अचानक राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेचे राजदूत जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयने छापा टाकला. हे प्रकरण त्यांच्या 'द रूम व्हेअर इट हॅपन्ड' या पुस्तकातील गुप्त माहितीच्या खुलाशाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळी ७ वाजता एफबीआय एजंट्सनी मेरीलँडच्या बेथेस्डा भागात बोल्टन यांच्या घरावर छापा टाकला.
एफबीआय संचालक काश पटेल यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. छापेमारीनंतर काश पटेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले की, "कोणीही कायद्यापेक्षा वर नाही. एफबीआय एजंट एका मोहिमेवर आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत बोल्टन हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. पण ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्यानंतर ते सतत त्यांच्या धोरणांवर टीका करत आहेत.
प्रकरण कधीचे आहे?
हे संपूर्ण प्रकरण २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या बोल्टन यांच्या पुस्तकाशी संबंधित आहे. ट्रम्प प्रशासनाच्या काळात अनेक गोपनीय गोष्टी पुस्तकात लिहिण्यात आल्या होत्या. ट्रम्प यांनी त्याचे प्रकाशन थांबवण्याचा प्रयत्नही केला होता, परंतु पुस्तक प्रकाशित झाले.
आरोप काय आहे?
सप्टेंबर २०२० मध्ये, ट्रम्प सरकारच्या न्याय विभागाने या पुस्तकाबाबत चौकशी सुरू केली. आता ही चौकशी पुढे नेत, एफबीआयने छापा टाकला आहे. बोल्टन यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती सार्वजनिक केल्याचा आरोप आहे.