या मुस्लिम देशात चेहरा झाकण्यावर बंदी, सरकारने कायदाच काढला; कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:53 IST2025-07-01T13:49:39+5:302025-07-01T13:53:45+5:30
या निर्णयाचा देशातील काही लोक विरोध करत आहेत.

या मुस्लिम देशात चेहरा झाकण्यावर बंदी, सरकारने कायदाच काढला; कारण काय..?
अनेक मुस्लिम देशांमध्ये बुर्खा/हिजाब/नकाब बाबत नियम खूप कडक आहेत. अशातच, मुस्लिम बहुल कझाकस्तानमध्ये सरकारने चेहरा झाकण्यावर बंदी घातली आहे. पंतप्रधान कासिम जोमार्ट तोकायेव यांनी याबाबत कायदाच काढला आहे. यानुसार, कझाकस्तानमध्ये कोणीही आपला चेहरा झाकू शकणार नाही. या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे. या निर्णयाबाबत कझाकस्तान सरकारचा युक्तिवाद असा आहे की, चेहरा झाकल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बसवलेले फेस रेकगनेशन तंत्रज्ञान काम करत नाही. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे.
कधीकाळी सोव्हिएत युनियनचा एक भाग असलेल्या कझाकस्तानमध्ये दीर्घकाळापासून ही मागणी होती. कझाकस्तानमध्ये लोकसंख्येत मुस्लिमांची संख्या सर्वाधिक असली तरी, देशाची संस्कृती अजूनही सोव्हिएत मूल्यांनी प्रभावित आहे. चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यासाठी मंजूर झालेल्या कायद्यात कोणत्याही एका धर्माचा किंवा त्याच्या पोशाखाचा उल्लेख नाही, परंतु हे स्पष्ट आहे की, चेहरा झाकण्यावर बंदी असेल.
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
पंतप्रधान तोकायेव यांनी या कायद्याचे कौतुक केले आहे. ते म्हणतात की, याद्वारे आपण आपली कझाक ओळख मजबूत करू शकू. चेहरा झाकणारे काळे कपडे घालण्यापेक्षा, आपले कझाक शैलीचे कपडे घालणे चांगले होईल. आपण आपली संस्कृती आणि पोशाखांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कझाकस्तान सरकारच्या या निर्णयाकडे प्रगतीशील दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. परंतु देशात एक वर्ग असा आहे, जो याच्या विरोधात आहे. या लोकांना वाटते की, नागरिकांना त्यांच्या मनाप्रमाणे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.
निषेधांनंतरही कझाकस्तान सरकार निर्णयावर ठाम
देशातील ठराविक वर्ग या निर्णयाचा विरोध करत आहे, परंतु सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. आपण आपली राष्ट्रीय ओळख टिकवून ठेवली पाहिजे, असे सरकारचे म्हणने आहे. पंतप्रधान ताकायेव म्हणतात की, धर्म हा लोकांचा वैयक्तिक विषय आहे, परंतु पोशाख असा असावा की, जो आपली राष्ट्रीय ओळख प्रतिबिंबित करतो. विशेष म्हणजे, कझाकस्तान व्यतिरिक्त, सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तानमध्येही हिजाबवर बंदी आहे.