नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:33 IST2026-01-01T16:32:46+5:302026-01-01T16:33:22+5:30
Switzerland Bar Explosion: स्वित्झर्लंडमधील एका प्रसिद्ध बारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण होरपळल्याची घटना आज पहाटे घडली.

नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
स्वित्झर्लंडमधील एका प्रसिद्ध बारमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने या उत्साहावर विरजण पडले. स्वित्झर्लंडमधील 'क्रेस मोंटाना' या लक्झरी अल्पाइन स्की रिसॉर्टमधील एका बारमध्ये पहाटेच्या सुमारास झालेल्या स्फोटात १० जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नैऋत्य स्वित्झर्लंडमधील व्हॅलेस कॅन्टन येथील प्रसिद्ध ले कॉन्स्टेलेशन या बारमध्ये गुरुवारी पहाटे १:३० वाजता हा स्फोट झाला. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बारमध्ये मोठी गर्दी होती. सुमारे ४०० लोकांची क्षमता असलेल्या या बारमध्ये स्फोटाच्या वेळी १०० हून अधिक लोक उपस्थित होते.
व्हॅलेस कॅन्टनचे पोलीस प्रवक्ते गाएटन लाथियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्फोट इतका भीषण होता की, क्षणार्धात संपूर्ण इमारतीला आगीने वेढले. या आगीत अनेक लोक अडकून पडले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये इमारतीतून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि लोकांचा आक्रोश ऐकू येत आहे. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
क्रेस मोंटाना हे स्वित्झर्लंडमधील एक अतिशय लोकप्रिय आणि हाय-प्रोफाइल स्की रिसॉर्ट आहे. विशेषतः ब्रिटीश पर्यटकांची येथे मोठी वर्दळ असते. जानेवारी महिन्याच्या शेवटी येथे एफआयएस वर्ल्ड कप हा जागतिक स्तरावरील स्कीइंग कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. अशा महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या काही दिवस आधीच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
स्विस पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून स्फोट नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. राजधानी बर्नपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेल्या या रिसॉर्टमध्ये सध्या दु:खाचे वातावरण आहे.