हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:37 IST2025-09-23T12:33:29+5:302025-09-23T12:37:13+5:30
उष्णतेशी संबंधित कारणांमुळे ६२,७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. महिला आणि वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसला.

हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
युरोपमध्ये २०२४ च्या उष्णतेच्या लाटेने कहर केला. नेचर मेडिसिन जर्नलमध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या एका नवीन रिपोर्टनुसार, उष्णतेशी संबंधित कारणांमुळे ६२,७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. महिला आणि वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसला. बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ (ISGlobal) च्या संशोधकांनी ३२ युरोपीय देशांमधून दररोज मृत्यूची माहिती गोळा केली. २०२२ ते २०२४ दरम्यान उष्णतेच्या लाटेमुळे एकूण १८१,००० हून अधिक मृत्यू झाले.
१ जून ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मृत्यूदर मागील वर्षाच्या तुलनेत २३% वाढला. २०२२ मध्ये झालेल्या ६७,९०० मृत्यूंपेक्षा एकूण मृत्यूंची संख्या थोडी कमी होती. रिसर्चचे प्रमुख लेखक टोमस जानोस म्हणाले, "हा डेटा आपल्याला सांगतो की, आपण आपल्या लोकसंख्येचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी तयारी सुरू केली पाहिजे." युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसनुसार, २०२४ चा उन्हाळा युरोपमधील सर्वात उष्ण उन्हाळा होता. अंदाजित मृत्यूंपैकी दोन तृतीयांश मृत्यू दक्षिण युरोपमध्ये झाले. इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले कारण तेथे वृद्धांची लोकसंख्या सर्वाधिक आहे.
इटालियन इमर्जन्सी मेडिसिन सोसायटीने म्हटलं आहे की, या वर्षीच्या अति तापमानामुळे काही भागात आपत्कालीन कक्षात २०% वाढ झाली आहे. यावरून असं दिसून येतं की वृद्धांसाठी उष्णतेचा धोका कायम आहे. CIMEU (इटालियन इमर्जन्सी मेडिसिन सोसायटी) चे अध्यक्ष अलेस्सांद्रो रिकार्डी यांनी रॉयटर्सला सांगितलं की, आधीच कमकुवत आणि अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना अधिक रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. यामुळे रुग्णालयांवर दबाव वाढला, जो फ्लूच्या हंगामात होतो.
युरोपियन आरोग्य अधिकारी आता उष्णतेच्या लाटेचे इशारे जारी करतात. उष्णतेच्या लाटेची व्याख्या देशानुसार बदलते. जानोस म्हणाले की, काही ठिकाणी, २४°C (७५.२°F) तापमान देखील मृत्यूचे कारण बनत आहे. युरोपियन पर्यावरण संस्थेचे अधिकारी जेरार्डो सांचेझ म्हणाले की, उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या पाहता, दीर्घकालीन गुंतवणूक आवश्यक आहे. सर्वांनाकुलिंग सिस्टम उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे.