मस्क यांच्या व्यक्तिगत आयुष्यातली अत्यंत टोकाची गुंतागुंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 07:54 IST2024-11-29T07:50:55+5:302024-11-29T07:54:14+5:30

तीन विवाहानंतर मस्क यांनी पुन्हा लग्न केले नाही. पण २०२१ ते २०२४ या काळात मस्क यांच्यापासून एका महिलेला आणखी तीन मुले झाली. त्यांच्यात फक्त मैत्री आहे. तिचे नाव शिवोन जिलिसी.

Elon Musk's ex-girlfriend, Clare 'Grimes' Boucher over big custody battle | मस्क यांच्या व्यक्तिगत आयुष्यातली अत्यंत टोकाची गुंतागुंत

मस्क यांच्या व्यक्तिगत आयुष्यातली अत्यंत टोकाची गुंतागुंत

जगात प्रत्येकाला आता इलॉन मस्क हे नाव माहीत झाले आहे. टेस्ला ही कार बनवणारी कंपनी, अंतराळासाठीची पहिली स्पेसेक्स ही कंपनी, आधीचा ट्विटर म्हणजे आताचा एक्स हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशा असंख्य छोट्या मोठ्या कंपन्यांची मालकी त्यांच्याकडे आहे. म्हणजे अब्जाधीशच. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत अब्जाधीश अशी त्यांची ख्याती आहे. शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदी निवडून आणण्यासाठी सर्व ती मदत मस्क यांनीच केली. महासत्तेच्या नवनियुक्त राष्ट्रपती म्हणून ट्रम्प निवडून आल्यावर त्यांनी लगेच मस्क यांचे आभार मानले, यातच सारे काही आले. आर्थिक सत्तेच्या आधारे राजकीय सत्तेचे नेतृत्व ठरवण्याची भूमिका या मस्क महाशयांनी पार पाडली, असे म्हणता येईल. अमेरिकेप्रमाणेच अनेक राष्ट्रांमध्ये इलॉन मस्क या नावाचा प्रभाव आणि दबाव आहे. पण या अब्जाधीशाची दीर्घकालीन मैत्रीण आणि त्यांच्या अपत्यांची आई मात्र दिवाळखोरीत गेल्यात जमा आहे. पण ती कहाणी समजून घेणे एवढे सोपे नाही कारण मस्क यांच्या व्यक्तिगत आयुष्यातली अत्यंत टोकाची गुंतागुंत!

५३ वर्षांच्या इलॉन मस्क यांनी आतापर्यंत तीन विवाह केले. एका महिलेशी दोनदा विवाहानंतर दोनदा घटस्फोट घेऊन पुन्हा लग्न केले आणि मग लगेच दोन वर्षांत कायमस्वरूपी घटस्फोटही देऊन टाकला. त्यांच्यापासून दोन पत्नींना नऊ आणि एका मैत्रिणीला तीन अशी एकूण १२ मुले झाली आहेत. खरे तर १३, पण पहिला मुलगा लहानपणीच वारला. मस्क यांचा प्रत्येक विवाह सरासरी सात वर्षेच टिकला किंवा सात वर्षांच्या आत पत्नीपासून ते विभक्त झाले. शेवटचा विवाह टिकला केवळ तीन साडेतीन वर्षे आणि त्या काळात त्यांना तीन मुले झाली. मस्क यांची पहिली पत्नी लेखिका व कादंबरीकार आहे. जेनीफर जस्टीन विल्सन यांच्याशी मस्क यांनी २००० साली विवाह केला. तिला पहिल्यांदा झालेले मूल वारले. नंतर जुळे आणि तिळे अशी पाच मुले झाल्यानंतर २००८ साली मस्क व जेनीफर जस्टीन वेगळे झाले. त्या पाचपैकी दोन मुले आता २० वर्षांची आहेत, तर तीन त्याहून लहान. या पाच मुलांच्या खर्चासाठी मस्क दरमहा २० हजार डॉलर्स म्हणजे सुमारे १५ ते १७ लाख रुपये देतात. 

मस्क यांची दुसरी पत्नी तालुलाह रिले ही इंग्लिश अभिनेत्री. तिने अनेक चित्रपटांत काम केले आहे. ती व मस्क हे २०१० ते २०१६ या काळात मध्ये मध्ये पती व पत्नी होते. असे म्हणायचे कारण म्हणजे या सहा वर्षांत त्यांनी तीनदा विवाह व तीनदा घटस्फोट घेतला. त्यांचा पहिला घटस्फोट विवाहानंतर दोन महिन्यांत झाला होता.  २०१० साली विवाह करण्याच्या दोन वर्षे आधी त्या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते. या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर दोन वर्षे इलोन मस्क यांनी कोणाशीही विवाह केला नाही, पण त्यांना अनेक मैत्रिणी होत्या. सुमारे दोन वर्षांनी म्हणजे २०१८ साली मस्क यांच्या आयुष्यात संगीत क्षेत्रातील एक महिला आली. त्यांचे प्रेमप्रकरण काही आठवडे चालले आणि ते एकत्र राहू लागले. 

या तरुणीचे नाव क्लेअर एलीस बाउचर. मूळची कॅनडातील ही महिला संगीत क्षेत्रात ग्रीम्स नावाने ओळखली जाते. ती गीतकार, संगीतकार, गायिका, निर्माती असे सर्व काही असून, तिचे काही अल्बम खूपच गाजले आहेत. ग्रीम्स ही मस्क यांच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान. तिला मस्कपासून  तीन मुले झाली.  ते दोघे २०२१ साली विभक्त झाले. ‘आम्ही वेगळे झालो आहोत; पण आमचे एकमेकांवर प्रेम आहे’, असे ग्रीम्स तेव्हा म्हणाली होती. पण दोन वर्षांनंतर म्हणजे २०२३ पर्यंत त्यांचे प्रेमही शिल्लक उरले नाही. बाकी उरले ते वादविवाद आणि मुलांनी कुणाबरोबर राहायचे यावरून सुरू झालेले कोर्टकज्जे. ग्रीम्स म्हणते, खरे तर आम्हा दोघांचे प्रेम कायमच पातळ होते. ते वेगळे झाले तरी ग्रीम्सला झालेली मुले मस्क यांच्याच ताब्यात आहेत. आम्ही दोघे त्या मुलांचे सहपालक आहोत, असे मस्क सांगतात. पण ती तिन्ही लहान मुले ग्रीम्सकडे जाऊ शकलेली नाहीत. तीन विवाहानंतर मस्क यांनी पुन्हा लग्न केले नाही. पण २०२१ ते २०२४ या काळात मस्क यांच्यापासून एका महिलेला आणखी तीन मुले झाली. त्यांच्यात फक्त मैत्री आहे. तिचे नाव शिवोन जिलिसी.

‘सगळे पैसे संपले!’
आपल्याला मुलांचा ताबा मिळावा, यासाठी मस्क यांची (विभक्त) पत्नी ग्रीम्स कायदेशीर लढाई लढत आहे. त्यात तिचे जवळपास सारे पैसे खर्च झालेत. ‘मी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, मी खचून गेले आहे आणि त्यामुळे माझ्याकडून नवी निर्मिती होईनाशी झाली आहे’, असे ग्रीम्स म्हणते. पण तिला तीन मुलांचा ताबा द्यायला मस्क मात्र तयार नाहीत. त्यासाठीची कायदेशीर लढाई त्यांनी चालूच ठेवलेली आहे.

Web Title: Elon Musk's ex-girlfriend, Clare 'Grimes' Boucher over big custody battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.