'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 13:49 IST2025-06-29T13:49:17+5:302025-06-29T13:49:56+5:30

Elon Musk To Trump: इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा उघडपणे विरोध केला आहे.

Elon Musk To Trump: 'Crazy and destructive decision...', Musk's venomous criticism of Trump's 'Big Beautiful' bill | 'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका


Elon Musk Criticised Trump: उद्योगपती इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर उघडपणे टीका केली आहे. ट्रम्प प्रशासनाने आणलेला नवीन कर आणि खर्च विधेयक अमेरिकेसाठी वेडेपणाचा आणि विनाशकारी असल्याचे मस्क यांचे म्हणने आहे. या विधेयकामुळे अमेरिकेचे गंभीर नुकसान होईल आणि लाखो नोकऱ्या जातील, असा दावाही त्यांनी केला आहे. 

एकेकाळी ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक असलेले मस्क आता उघडपणे ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका करताना दिसतात. ट्रम्प प्रशासनाने आणलेल्या या नवीन विधेयकात अशा अनेक तरतुदी आहेत, ज्यांचा अमेरिकेच्या सध्याच्या सामाजिक आणि आर्थिक रचनेवर खोलवर परिणाम होऊ शकतो. मेडिकेड आणि फूड स्टॅम्प सारख्या सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च कपात, अमेरिका-मेक्सिको सीमा भिंत वाढवण्यासाठी $46 अब्ज, 1 लाख स्थलांतरित बंदीसाठी $45 अब्ज, 10,000 नवीन ICE अधिकाऱ्यांची भरती, ज्यांच्यासाठी $10,000 चा बोनस, $350 अब्ज सीमा आणि राष्ट्रीय सुरक्षा योजनेचा एक भाग इत्यादींचा यात समावेश आहे. यावरुन मस्क सातत्याने टीका करत आहेत.

भविष्यातील उद्योगांसाठी धोका - मस्कचा इशारा
इलॉन मस्क यांचा असा दावा आहे की, हे विधेयक अमेरिकेच्या भविष्यातील तंत्रज्ञान आणि उद्योगांसाठी घातक ठरू शकते. हे विधेयक भविष्यातील उद्योगांना हानी पोहोचवून जुन्या उद्योगांना सवलती देते. याद्वारे त्यांनी सूचित केले की, हे विधेयक तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या वेगाने वाढणाऱ्या उद्योगांच्या विकासात अडथळा ठरू शकते.

४ जुलैपर्यंत हे विधेयक मंजूर करण्याचे आदेश 
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन खासदारांना ४ जुलैपूर्वी सिनेट आणि सभागृहात हे विधेयक मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही सभागृहांमध्ये रिपब्लिकन पक्षांला बहुमत असल्याने, विधेयक मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी या विधेयकाचे वर्णन त्यांच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचा एक भाग म्हणून केले आहे, ज्यामध्ये देशाच्या सीमा मजबूत करणे, बेकायदेशीर स्थलांतरितांना हटवणे आणि सुरक्षेवर खर्च वाढवणे ही मुख्य उद्दिष्टे आहेत.

दरवर्षी १० लाख स्थलांतरितांना हद्दपार करण्याची योजना
या विधेयकाचा सर्वात वादग्रस्त पैलू म्हणजे, ट्रम्प यांनी दरवर्षी १० लाख स्थलांतरितांना अमेरिकेतून हाकलून लावण्याचा मुद्दा मांडला आहे. अमेरिकन इतिहासातील ही सर्वात मोठी हद्दपारी मोहीम असेल. तथापि, या योजनेवर टीकाही होत आहे. मस्कप्रमाणेच अनेक उद्योगपती, मानवाधिकार कार्यकर्ते आणि काही रिपब्लिकन खासदारांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: Elon Musk To Trump: 'Crazy and destructive decision...', Musk's venomous criticism of Trump's 'Big Beautiful' bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.