इजिप्तमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला. दोन ट्रेनची जोरदार धडक झाल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात 32 जणांच्या मृत्यू झाला असून 66 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिस्त्रच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मिस्त्र शहरातील सोहागच्या उत्तरेला शुक्रवारी दोन ट्रेनची धडक झाली. यामध्ये आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सोहाग प्रांतातील ताहाटा जिल्ह्यात रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. तसेच जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले जात आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. वेगाने बचावकार्य सुरू असून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मिस्त्रचे आरोग्यमंत्री घटनास्थळी जात आहेत. तसेच जखमींमधील अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यातील काहींच प्रकृती ही अत्यंत चिंताजनक आहे.
ट्रेनचा अपघात झाला त्या घटनास्थळावरचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. यात ट्रेनचे डबे पलटल्याचं दिसून येत आहे. तर काही जण जखमी झाले असून बेशुद्ध अवस्थेत आहेत. घटनेची माहिती मिळताच सर्वथम स्थानिक लोक मदतीसाठी पुढे आले. त्यांनी अडकलेल्या प्रवाशआंना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. इजिप्तमध्ये याआधी देखील मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. पायाभूत सुविधा आणि देखभालीच्या अभावामुळे हे अपघात होत असल्याचं सांगण्यात येतं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.