Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरद्वारे प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. भारतानेपाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार सुरुच आहे. दुसरीकडे, पाकिस्तानकडून भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरु आहे. त्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानातील अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची अवस्था आणखी बिकट होणार आहे. अशातच पाकिस्तानने भारतासमोर गुढघे टेकण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. कारण पाकिस्तानी सैन्यातील माजी अधिकारी देखील देवाकडे वाचवण्याची प्रार्थना करत आहेत.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा परिणाम आता पाकिस्तानी संसदेतही दिसून येत आहे. ऑपरेशन सिंदूर सुरु झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जगाला त्यांच्या देशाला वाचवण्याचे आवाहन केले होते. आता त्यांच्याच देशातील एका खासदाराने भारताविरुद्ध बोलताना रडायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी खासदाराने देशाला आणि स्वतःला वाचवण्यासाठी अल्लाहला प्रार्थनाही केली. हे खासदार दुसरे तिसरे कोणी नसून निवृत्त मेजर ताहिर इक्बाल आहेत, जे पाकिस्तानी सैन्याचे माजी अधिकारी आहेत. ताहिर इक्बाल यांनी संसदेत पाकिस्तानचा कमकुवतपणा उघडपणे मान्य केलाय. आता फक्त अल्लाहच पाकिस्तानला वाचवू शकतो, असं ताहिर इक्बाल सांगत आहेत.
ताहिर इक्बाल यांचे संसदेत रडणे पाकिस्तानची वाढती असुरक्षितता आणि राजकीय अस्थिरता दर्शवते. भारतीय लष्कराच्या ऑपरेन सिंदूरने पाकिस्तानी सरकारला धक्का बसला आहे. संसदेत यावर चर्चा सुरू असताना, ताहिर इक्बाल आपलं म्हणणं मांडताना रडू लागले. त्यांचा हा व्हिडीओ पाकिस्तानासह भारतातही व्हायरल होत आहे.
"आपला समुदाय कमकुवत आहे. म्हणून एकत्र या आणि देवाला प्रार्थना करा की हे अल्ला, आम्ही तुम्हाला विनंती करतो. तुम्ही आमच्यावर सोपवलेल्या या देशाचे रक्षण करा. हा तुमच्या प्रार्थनेचा देश आहे. तुम्ही कायद-ए-आझमला इंग्लंडमध्ये भेटलात, त्यांच्या स्वप्नात आलात आणि त्यांना परत जाऊन पाकिस्तानचा प्रश्न सोडवण्यास सांगितले. तुम्ही खाना कलात येथे त्यांच्या स्वप्नात आलात आणि हा देश निर्माण करण्याचा आदेश दिला. अल्लाहने आम्हाला हा देश दिला आहे आणि अल्लाह या देशाचे रक्षण करेल," असं खासदार ताहिर इक्बाल म्हणत आहेत.
"जगात कुठेही पाहा, आपली कमतरता आहे. आपण असहाय्य आहोत. आम्ही पापी आहोत, पण आम्ही तुमचे प्रिय आहोत. अल्लाहच्या फायद्यासाठी, आमच्यावर दया करा. तुम्ही काश्मीरला जा किंवा पॅलेस्टाईनला, तुम्ही कुठेही जा, मुस्लिमांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे ज्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. म्हणून कृपया आम्हाला क्षमा करा. आम्ही तुमच्यासमोर आपले डोके टेकवतो आणि क्षमा मागतो. यात काही शंका नाही की आम्ही मोठे पापी आहोत, परंतु तुमची दया अफाट आहे. जर तुम्ही आमच्यावर दया केलीत तर इन्शा अल्लाह, आम्ही यशस्वी होऊ आणि आम्ही प्रार्थना करतो की या देशाचे रक्षण करा आणि त्यांना पराभूत करण्यासाठी आम्हाला शक्ती द्या," असंही ताहिर इक्बाल म्हणाले.