फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 08:10 IST2025-10-01T08:09:11+5:302025-10-01T08:10:52+5:30
फिलीपिन्समध्ये भूकंपाने प्रचंड विनाश घडवून आणला आहे. ६.९ रिश्टर स्केलच्या या भूकंपात २२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.

फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
फिलीपिन्समध्ये काल रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यामध्ये २२ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले. भूकंपाची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल इतकी होती. फिलीपिन्स सरकारच्या मते, या वर्षातील ही सर्वात मोठी आपत्ती आहे, यामुळे इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू झाले आहेत.
मंगळवारी रात्री १० वाजता सेबू सिटीच्या किनाऱ्यावर जोरदार भूकंप झाला, यामुळे अनेक इमारती कोसळल्या. सॅन रेमिजिओ शहराच्या महापौर अल्फी रेनेस यांनी भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाची पुष्टी केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, २२ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी २१ जणांचा मृत्यू एकट्या सेबू प्रांतात झाला आहे.
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
त्सुनामीचा इशारा नाही
न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, भूकंपामुळे फिलीपिन्समध्ये एक इमारत कोसळल्याने अंदाजे ३७ लोक जखमी झाले आहेत. फिलीपिन्समध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.
फिलीपिन्स भूकंपशास्त्र संस्थेने सांगितले की, भूकंपामुळे प्रवाह आणि समुद्राच्या पातळीत बदल होऊ शकतात. लोकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.