भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:43 IST2025-06-03T10:42:38+5:302025-06-03T10:43:24+5:30

कराचीमध्ये झालेल्या भूकंपामुळे मलीर तुरुंगाच्या भिंतींना मोठे तडे गेले होते. याचाच फायदा घेत तिथे कैद असलेल्या गुन्हेगारांनी भिंती तोडून तुरुंगातून पळ काढला.

Earthquake cracks in Pakistani prison walls, prisoners escape | भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!

भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!

एखाद्या ठिकाणी भूकंप झाला की त्या ठिकाणची घरे, इमारती यांचंही मोठं नुकसान होतं. अनेकदा वास्तू कोसळतात. अर्थात भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत होते. मात्र, अशाच एका भूकंपात पाकिस्तानी कैद्यांनी चांगलीच संधि साधली आहे. कराचीमध्ये झालेल्या भूकंपामुळे मलीर तुरुंगाच्या भिंतींना मोठे तडे गेले होते. याचाच फायदा घेत तिथे कैद असलेल्या गुन्हेगारांनी भिंती तोडून तुरुंगातून पळ काढला. 

कराचीचे डिआयजी मोहम्मद हसन सेहतो यांनी याबद्दल माहिती देताना म्हटलं की, भूकंपाचा फायदा घेत अनेक कैदी तुरुंगातून  पसार झाले. त्यांनी तुरुंगाचे दरवाजे आणि भिंती तोडल्या. इतकंच नाही तर, तुरुंगात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. अनेक कैद्यांनी तुरुंगातील अधिकाऱ्यांची शस्त्रे हिसकावून घेतली. या दरम्यान पोलीस आणि कैदी यांच्यात गोळीबार देखील झाला. मात्र, तरीही काही कैदी पळून जाण्यात सफल झाले. या दरम्यान एक कैदी गोळी लागून जखमी देखील झाला.

कैद्यांना पुन्हा पकडण्यासाठी पोलिसांची धावाधाव!

कराचीच्या तुरुंगातून पळून गेलेल्या या कैद्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला आहे. जागोजागी त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. २०हून अधिक पळून गेलेल्या कैद्यांना कझाफी टाउन, शाह लतीफ आणि भैंस कॉलनी या भागांतून  पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. तुरुंगाबाहेर रेंजर्स तैनात करण्यात आले आहेत आणि आजूबाजूच्या भागात शोध मोहीम सुरू आहे.

कराची भूकंपाने हादरले
ही घटना कराचीमध्ये २४ तासांत झालेल्या दहाव्या भूकंपाच्या वेळी घडली. रात्री ११:१६ वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता २.४ होती. लांधी, शेरपाओ आणि कायदााबाद सारख्या भागात या भूकंपाचे झटके जाणवले. हवामान खात्याने सांगितले की, कीर्थर फॉल्ट लाइनच्या जवळ असल्याने या भागात किरकोळ भूकंप होणे सामान्य आहे.

सिंध प्रांताचे मंत्री अली हसन झरदारी यांनी या घटनेची दखल घेतली आहे आणि तुरुंग महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. त्यांनी परिसराला घेराव घालण्याचे आदेश दिले आहेत आणि पळून जाणाऱ्या प्रत्येक कैद्याला पकडले पाहिजे, असा आदेश दिला आहे.

Web Title: Earthquake cracks in Pakistani prison walls, prisoners escape