Dustin Vital: 'Shravanbal' in America! | डस्टिन व्हायटल : अमेरिकेतला ‘श्रावणबाळ’!

डस्टिन व्हायटल : अमेरिकेतला ‘श्रावणबाळ’!

श्रावणबाळ खांद्यावर कावड घेऊन त्यात आपल्या वृद्ध मातापित्यांना बसवून तीर्थयात्रेला घेऊन गेला, ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे. पुत्र असावा तर असा, असे त्याचे गुणगान आपल्याकडे आजही केले जाते, पण असाच एक आधुनिक श्रावणबाळ अमेरिकेतही आहे. त्याची कथा थोडी वेगळी आहे. पण, या श्रावणबाळाचे सध्या जगभर कौतुक होत आहे. त्याचे नाव आहे डस्टिन व्हायटल. अमेरिकेच्या फिलाडेल्फिया भागात राहणाऱ्या डस्टिनच्या आईला, ग्लोरियाला मूत्राशयाचा कॅन्सर झालेला आहे आणि तिची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आपल्या आजाराला ती कशीबशी तोंड देते आहे. 


आईवर निरतिशय प्रेम असलेला डस्टिन आईला कॅन्सर झाल्यावर खूपच हादरला. आईसाठी आपल्याला जे काही करता येईल ते करायला त्यानं सुरुवात केली. त्यांची आर्थिक परिस्थिती मुळातच जेमतेम. डस्टिन एका शाळेत शिक्षक आहे. नोकरीतून जे काही उत्पन्न मिळतं त्यातून तो आईवर इलाज करीत आहे.
गेल्या वर्षीच आईच्या कॅन्सरबाबत दोघांनाही कळलं. ग्लोरियाची परिस्थिती अतिशय नाजूक होती आणि ती आता फक्त काही दिवसांचीच सोबती आहे, हे ऐकल्यावर डस्टिनच्या पायाखालची वाळूच सरकली. तो अत्यंत निराश झाला. आईवर त्यानं तातडीनं उपचार सुरू केले. इजिप्तचे पिरॅमिड‌्स हे जगातलं एक आश्चर्य मानलं जातं. डस्टिनची आई ग्लोरियाचंही लहानपणापासूनचं स्वप्न होतं, हे पिरॅमिड‌्स पाहण्याचं, त्यांना भेट देण्याचं. आधीच आर्थिक परिस्थिती नाजूक, त्यात आता तब्येतीनंही साथ सोडल्यानं आपलं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, हे ग्लोरियाला कळून चुकलं. पण, आईच्या आयुष्याचा दोर होता होईतो, आणखी बळकट करण्याच्या मागे लागलेल्या आधुनिक श्रावणबाळ, डस्टिननं आता आईचं स्वप्नही पूर्ण करण्याचं मनावर घेतलं. आपली नोकरी सांभाळून आईची देखभाल करणं, तिला औषधपाणी देणं, इतकंच काय, तिला खाऊ-पिऊ घालण्याचं कामही डस्टिन रोज करतो. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, याचा डस्टिन गांभीर्यानं विचार करू लागला. डस्टिनची आई ग्लोरिया ही अतिशय उत्कृष्ट कूक. त्यानं मग तिच्याकडून सगळा स्वयंपाक शिकून घेतला. 
नवनवे चविष्ट पदार्थ कसे तयार करायचे, हे समजून घेतलं. त्यानुसार प्रयोगाला सुरुवात केली. थोड्याच दिवसांत आईप्रमाणेच डस्टिनही अतिशय उत्तम कूक झाला. तऱ्हेतऱ्हेचे उत्तम पदार्थ तयार करू लागला. बटर, चीज सँडविचपासून सुरुवात केली. हे पदार्थ त्यानं आपले मित्रमंडळी, नातेवाईक, परिसरातले लोक यांना विकायला सुरुवात केली. त्यांच्यामार्फत इतरांपर्यंतही त्याच्या पदार्थांची आणि त्याच्या चवदार हातांची गोष्ट झपाट्यानं पसरली. त्याच्या पदार्थांची ऑर्डर वाढू लागली, इतकी की थोड्याच दिवसांत  त्याच्या घराच्या बाहेर ग्राहकांच्या आणि कार्सच्या रांगा लागायला लागल्या. जागाही खूपच कमी पडायला लागली. त्यातच एका दानशूर व्यक्तीनं आपला फूडट्रक डस्टिनला वापरायला दिला. त्यानंतर अगदी रात्रीचा दिवस करून त्यानं अख्ख्या शहरात आपले खाद्यपदार्थ पाठवायला सुरुवात केली. या माध्यमातून केवळ काही महिन्यांतच त्यानं उत्तम पैसे गाठीशी बांधले. 
आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत्या काही दिवसांत आईला घेऊन तो आता इजिप्तला जाणार आहे. हे पिरॅमिड‌्स तिनं डोळे भरून पाहावेत यासाठी तो आतापासूनच आसुसला आहे. पण, इजिप्तच्या या यात्रेला तो फक्त आईलाच नाही, तर घरातल्या साऱ्यांनाच घेऊन जाणार आहे. १४ जणांच्या या  प्रवासाचा, खाण्यापिण्याचा, राहण्याचा, तिथे फिरण्याचा खर्चच मोठा आहे. पण, गेल्या काही महिन्यांत डस्टिननं इतकं काम केलं आणि त्याच्या खाद्यपदार्थांनाही इतका उत्तम प्रतिसाद मिळाला, की या खर्चासाठी लागणाऱ्या रकमेव्यतिरिक्त त्यानं आणखी १८ हजार डॉलर्सचीही (साधारण तेरा लाख रुपये) कमाई केली. आईच्या केवळ एका स्वप्नासाठी आणि आपल्या हयातीतच तिचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी जीवाचं रान करणारा डस्टिन आधुनिक काळातला श्रावणबाळ आहे.
डस्टिन आणि त्याची आई दोघंही आता अतिशय खूश आहेत. आई ग्लोरिया तर म्हणते, मी इतकी भाग्यवान आहे, की माझ्याइतकी भाग्यशाली इजिप्तची राजकुमारी क्लिओपात्राही नसेल! 
 मुलगा डस्टिन म्हणतो, आईसाठी मी प्राणही द्यायला तयार आहे. तिनं जर चंद्रावर जाण्याचं स्वप्न पाहिलं असतं, तर तेही मी पूर्ण केलं असतं! 

पाय हवा की आयुष्य?
अमेरिकेतलीच आणखी एक प्रेरणादायी कहाणी. हीथर एबॉट ही तरुणी मॅरेथॉन धावपटू, पण काही वर्षांपूर्वी मॅरेथॉन शर्यतीत धावत असतानाच बॉम्बस्फोट झाला. हीथरलाही आपला एक पाय या स्फोटात गमवावा लागला. या अनुभवाबद्दल हीथर सांगते, स्फोटानंतर चार दिवसांत माझ्यावर तीन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. पाय गमावल्याचं मला फारच दु:ख झालं होतं.. पण मी स्वत:लाच एक प्रश्न विचारला, ‘पाय हवा, की आयुष्य?’ त्यानंतर अपंगांच्या मदतीसाठी मी स्वत:ला वाहून घेतलं. आतापर्यंत पन्नासपेक्षाही जास्त लोकांना तिनं कृत्रिम अवयवांचं दान केलं आहे. आपल्या पहिल्या कृत्रिम पायालाही तिनं नाव दिलं होतं, ‘रोशनी’

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dustin Vital: 'Shravanbal' in America!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.