‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 00:10 IST2025-12-22T00:06:20+5:302025-12-22T00:10:34+5:30
Asim Munir News: ऑपरेशन सिंदूरवेळी आमच्यावर चौफेर दबाव असताना अल्लाहच्या मदतीने पाकिस्तानी लष्कराला वाचवले. तेव्हा आम्ही आम्हाला दैवी मदत मिळत असल्याचे पाहिले, असा दावा आसिम मुनीर यांनी केला.

‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवला होता. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतीय सैन्यदलांनी केलेल्या तुफानी कारवाईमध्ये पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्ड्यांसह पाकिस्तानच्या हवाई तळांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. अखेरीस पाकिस्ताने युद्धविरामासाठी विनवणी केल्यावर भारतीय सैन्यदलाने शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला होता. दरम्यान, आता पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर यांनी मोठं विधान केलं आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी आमच्यावर चौफेर दबाव असताना अल्लाहच्या मदतीने पाकिस्तानी लष्कराला वाचवले. तेव्हा आम्ही आम्हाला दैवी मदत मिळत असल्याचे पाहिले, असा दावा आसिम मुनीर यांनी केला.
आसिम मुनीर म्हणाले की, मे महिन्यात जेव्हा शत्रू भारत आपल्या पूर्ण शक्ती आणि तंत्रज्ञानासह आमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा सर्वांची विचारशक्ती कुंठित झाली होती. परिस्थिती अशी होती की, कुठल्याही लष्करी प्रत्युत्तराच्या हिशेबाने वाचणं कठीण झालं होतं. मात्र मात्र तेव्हा आम्ही तिथे अल्लाहकडून मदत येताना पाहिलं, हे मी ऑन रेकॉर्ड सांगतो. तो एक दैवी हस्तक्षेप होता. ज्याने आमच्या सैनिकांचं मनोधैर्य खच्ची होण्यापासून वाचवलं आणि शत्रूचे मनसुबे उधळून लावले. हा विजय हत्यारांपेक्षा ईमानाचा होता. कारण तांत्रिकदृष्ट्या शत्रू आमच्या खूप पुढे होता, असा दावाही मुनीर यांनी केला.
या वक्तव्यामधून आसिम मुनीर यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतीय सैन्यदलांनी केलेल्या तुफानी आणि अचूक हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या रडार आमि एअर डिफेन्स सिस्टिमच्या झालेल्या नुकसानीची कबुली दिली आहे. तसेच पाकिस्तानी लष्कराला प्रत्युत्तर देण्यात आलेल्या अपयशाला लपवण्यासाठी दैवी चमत्काराचा उल्लेख केल्याचे बोलले जात आहे. मात्र पाकिस्तानमधील सर्व प्रसारमाध्यमांनी आसिम मुनीर यांनी केलेल्या या दाव्याला प्रामुख्याने प्रसिद्धी दिली आहे. तसेच आसिम मुनीर यांचं हे वक्तव्य प्रसिद्ध झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे.