कोण कितीही अब्जाधीश असला, तीस मार खान असला तरी त्याच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जिथे तो सारे पदाचे अभिनिवेश सोडून द्यावे लागतात. असाच क्षण दुबईच्या क्राऊन प्रिन्सवर आला. अबु धाबीचे क्राऊन प्रिंस शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी आपली व्हीआयपी सीट सोडली आणि एका पायावर भिंतीला टेकून अख्खी मॅच पाहिली. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जगभरातील अब्जाधीशांना लाजवेल एवढी संपत्ती असलेला व्यक्ती, दुबईचा शेख असा का वागला असेल? तो किती व्यस्त असेल परंतू आवर्जून त्याने तो सामना का पाहिला असेल बरे... त्याच्यातील बापाने हे त्याला करायला भाग पाडले. नाहयान यांची मुलगी शेखा शम्मा हिची जिऊ जित्सू मॅच सुरु होती. ही मॅच पहायला शेख येणार हे आयोजकांना समजले होते. त्यांनी त्यांच्यासाठी व्हीआयपी लाऊंज सजविला होता. शेख आले, सामन्यापूर्वी त्या खुर्चीतही बसले परंतू जसा सामना सुरु झाला त्याच्यातील बापमाणूस त्याला तिथे स्वस्थ बसू देत नव्हता.
शेखने स्टेडिअममधील आपली खूर्ची सोडली आणि थेट मैदान गाठले. मैदानावर भिंतीला टेकून एका पायावर हा माणूस मॅच पाहत होता. दुबईच्या शेखच्या डोळ्यासमोरच त्याच्या मुलीशी दोन हात करायचे आहेत, हे समजल्यावर त्या चिमुकल्या जिवाला काय वाटले असेल, असेही लोक सोशल मीडियावर बोलत आहेत.
ही मॅच शेखच्या मुलीनेच जिंकली, ती धावत आपल्या वडिलांकडे गेली आणि त्यांना मिठी मारली. वडिलांच्याच हस्ते तिला मेडल देण्यात आले. हे दृष्य पाहून तिथे उपस्थित प्रत्येकजण भावूक झाला होता. या क्षणांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.