काराकासमध्ये राष्ट्राध्यक्ष भवनावर ड्रोन हल्ला; ४५ मिनिटे तुफान गोळीबार, व्हेनेझुएला पुन्हा एकदा हादरले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 08:35 IST2026-01-06T08:34:38+5:302026-01-06T08:35:45+5:30
काराकासमध्ये युद्धाचा भडका! एअर डिफेन्स सिस्टमने पाडले ड्रोन; शहरात ब्लॅकआउट, जनता दहशतीत

काराकासमध्ये राष्ट्राध्यक्ष भवनावर ड्रोन हल्ला; ४५ मिनिटे तुफान गोळीबार, व्हेनेझुएला पुन्हा एकदा हादरले!
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर हा देश शांत होईल असे वाटत असतानाच, आता राजधानी काराकासमध्ये भीषण युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी रात्री उशिरा राष्ट्राध्यक्ष भवनाजवळ, मिराफ्लोरेस पॅलेस येथे अज्ञात ड्रोन दिसल्याने खळबळ उडाली. यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने एअर डिफेन्स सिस्टम सक्रिय करत हे ड्रोन पाडले. या कारवाईदरम्यान जवळपास ४५ मिनिटे शहरात अंधाधुंद गोळीबार सुरू होता, ज्यामुळे सामान्य नागरिक दहशतीत आहेत.
आकाशातून मृत्यूचे सावट; अँटी-एअरक्राफ्ट गनचा मारा
मिराफ्लोरेस पॅलेसच्यावर संशयास्पद ड्रोन घोंघावत असल्याचे दिसताच वेनेझुएलाच्या लष्कराने आक्रमक पाऊल उचलले. अँटी-एअरक्राफ्ट गनच्या सहाय्याने हे ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले. या संघर्षावेळी संपूर्ण काराकास शहरात गोळीबाराचे आवाज घुमत होते. इतकेच नाही तर काही भागांतील वीजपुरवठाही खंडित झाला होता. सध्या संपूर्ण राष्ट्राध्यक्ष भवनाला वाहने आणि लष्करी जवानांनी वेढा घातला असून, सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
Anti-aircraft used to SHOOT DOWN DRONES NEAR PRESIDENTIAL PALACE https://t.co/SQqeLqtblvpic.twitter.com/UPUYjMlNmq
— RT (@RT_com) January 6, 2026
'त्या' गोळीबाराशी आमचा संबंध नाही; अमेरिकेने हात झटकला
शनिवारी मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर आता झालेल्या या ड्रोन हल्ल्याचा संशय पुन्हा एकदा अमेरिकेवर घेतला जात होता. मात्र, व्हाइट हाऊसने तातडीने स्पष्टीकरण देत या घटनेशी अमेरिकेचा कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. "काराकासमध्ये काय घडले याची आम्हाला कल्पना आहे, पण त्यात अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही," असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
डेल्सी रॉड्रिग्ज यांनी घेतली शपथ आणि हिंसाचार भडकला
अमेरिकेच्या मदतीने डेल्सी रॉड्रिग्ज यांनी अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली असतानाच हा हल्ला झाला आहे. दुसरीकडे, न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात हजर करण्यात आलेल्या निकोलस मादुरो यांनी आपल्यावरील ड्रग्ज तस्करीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "मी निर्दोष आहे," असा दावा मादुरो यांनी न्यायालयासमोर केला आहे.