ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 17:02 IST2025-08-24T17:00:32+5:302025-08-24T17:02:36+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण...

ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नुकतीच ट्रम्प यांनी अलास्का येथे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेटही घेतली. मात्र, अमेरिकेच्या या प्रयत्नांना न जुमानता, रशियन सैन्याने युक्रेनवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, त्यांनी डोनेस्तक प्रदेशातील स्रेडने आणि क्लेबान बायक ही दोन गावे ताब्यात घेतली आहेत.
रशियन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत रशियन सैन्याने युक्रेनच्या १४३ लष्करी तळांवर हल्ले केले, यात युक्रेनचे लष्करी उद्योग आणि सशस्त्र दलांच्या तात्पुरत्या तळांचा समावेश आहे. याशिवाय, रशियन हवाई संरक्षण प्रणालींनी चार युक्रेनियन हवाई बॉम्ब आणि १६० ड्रोन पाडल्याचाही दावा केला आहे.
ट्रम्प यांचा रशियाला इशारा
डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही देशांमध्ये शांतता करार घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अलिकडेच त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. जर दोन आठवड्यांत रशियाने युद्धविरामाची घोषणा केली नाही तर, ते त्यांच्यावर नवीन निर्बंध लादतील, असा इशारा त्यांनी दिला.
पुतिन यांच्याशी कोणत्याही चर्चेसाठी युक्रेन तयार
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी शनिवारी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी चर्चा केली. झेलेन्स्की यांनी सांगितले की, ते पुतिन यांच्याशी कोणत्याही प्रकारच्या थेट चर्चेसाठी तयार आहेत. त्यांनी रामाफोसा यांना वॉशिंग्टनमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल आणि इतर राजनैतिक प्रयत्नांबद्दल माहिती दिली. झेलेन्स्की यांनी आरोप केला की "रशिया युद्ध लांबवण्याचा प्रयत्न करत आहे."