डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 09:48 IST2025-10-24T09:44:51+5:302025-10-24T09:48:01+5:30
रशियावरील नव्या निर्बंधांवरून ट्रम्प-पुतीन यांच्यात शाब्दिक चकमक; जागतिक तेल बाजारात खळबळ, भारतावरही परिणाम होण्याची शक्यता

डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या अमेरिकेने नुकत्याच लादलेल्या तेल कंपन्यांवरील निर्बंधांचा अर्थव्यवस्थेवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही, या दाव्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी थेट उत्तर दिले आहे. "त्यांना तसं वाटतंय हे छान आहे. सहा महिन्यांनी मी तुम्हाला सांगतो, याचे काय परिणाम झाले ते कळतील," असा सूचक इशारा ट्रम्प यांनी दिला. युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी रशियावर दबाव टाकण्याच्या उद्देशाने अमेरिकेने 'रोसनेफ्ट' आणि 'लुकोइल' या रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. या निर्णयानंतर जागतिक तेल किमतीत ५% वाढ झाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांचा आत्मविश्वास; पुतीन यांचा नकार
दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध संदर्भात रशियावर निर्बंध लादण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी पुतीन यांच्या प्रतिक्रियेला महत्त्व दिले नाही. "पुढे काय होते ते पाहू," असे म्हणत त्यांनी निर्बंधांचा खरा परिणाम सहा महिन्यांत दिसेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. याउलट, पुतीन यांनी अमेरिकेच्या या कृतीला 'दबावतंत्र' म्हटले आहे. "कोणताही स्वाभिमानी देश किंवा जनता दबावाखाली येऊन निर्णय घेत नाही," असे म्हणत पुतीन यांनी अमेरिकेचे म्हणणे फेटाळले आहे.
भारतालाही फटका बसण्याची शक्यता
अमेरिकेच्या या निर्बंधांचा मोठा परिणाम रशियाकडून तेल आयात करणाऱ्या भारत आणि चीन यांसारख्या देशांवर होणार आहे. निर्बंधांमुळे दोन्ही रशियन तेल कंपन्या अमेरिकन डॉलर-आधारित जागतिक पेमेंट सिस्टिममधून बाहेर पडतील. त्यामुळे भारत आणि चीनमधील अनेक तेल शुद्धीकरण कंपन्या सध्या त्यांच्या आयात करारांचा आढावा घेत आहेत. ट्रम्प यांनी अलीकडेच भारत रशियाकडून तेल आयात कमी करेल, असा दावा केला असला तरी, याबाबत भारताकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, भारतीय रिफायनरीज आता सरकारी मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा करत आहेत.
ट्रम्प यांनी बुडापेस्ट बैठक रद्द केली
दरम्यान, युक्रेन मुद्द्यावर ट्रम्प आणि पुतीन यांच्यात बुडापेस्ट येथे प्रस्तावित असलेली भेटही अमेरिकेने रद्द केली आहे. "मला ही बैठक योग्य वाटली नाही. आपल्याला हवा असलेला परिणाम यातून मिळेल असे वाटले नाही, म्हणूनच मी ती रद्द केली. परंतु भविष्यात ही बैठक निश्चितच होईल," असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.