प्रत्येकाच्या खात्यात ९० लाख जमा करणार! 'या' देशातील नागरिकांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची थेट ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:25 IST2026-01-10T12:24:19+5:302026-01-10T12:25:46+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या प्रस्तावामुळे डेन्मार्क आणि युरोपीय देशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

प्रत्येकाच्या खात्यात ९० लाख जमा करणार! 'या' देशातील नागरिकांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची थेट ऑफर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाला चकित करणारा प्रस्ताव समोर आणला आहे. जगातील सर्वात मोठे बेट असलेल्या 'ग्रीनलँड'वर ताबा मिळवण्यासाठी ट्रम्प आता 'साम-दाम' या नीतीचा अवलंब करताना दिसत आहेत. ताज्या वृत्तानुसार, ग्रीनलँडमधील प्रत्येक नागरिकाला १०,००० ते १,००,००० डॉलर्स (म्हणजेच साधारणपणे ९ लाख ते ९० लाख भारतीय रुपये) देऊन आपल्या बाजूने वळवण्याची योजना ट्रम्प प्रशासनात शिजत आहे. या प्रस्तावामुळे डेन्मार्क आणि युरोपीय देशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
काय आहे ट्रम्प यांची 'कॅश' ऑफर?
ग्रीनलँडची एकूण लोकसंख्या सुमारे ५७,००० इतकी आहे. वॉशिंग्टनमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत चर्चेनुसार, जर या नागरिकांना एकरकमी मोठी रक्कम दिली, तर ते अमेरिकेच्या नियंत्रणाखाली येण्यास तयार होतील, असा ट्रम्प यांचा अंदाज आहे. या संपूर्ण योजनेसाठी अमेरिकेला जवळपास ५.७ अब्ज डॉलर्स खर्च करावे लागतील. ही रक्कम ग्रीनलँडच्या नैसर्गिक संसाधनांच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ग्रीनलँडमध्येच का रस?
लोकसंख्या कमी असली तरी ग्रीनलँडचे भौगोलिक स्थान अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्क्टिक क्षेत्रातील नैसर्गिक संपत्ती, खनिज साठे आणि रशिया-चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी ग्रीनलँडवर ताबा असणे अमेरिकेसाठी लष्करी गरज बनली आहे. ट्रम्प यांनी तर स्पष्टपणे म्हटले आहे की, ग्रीनलँड मिळवणे हे अमेरिकेच्या जागतिक ताकदीसाठी केवळ रणनीतिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे.
लष्करी कारवाईची धमकी अन् नाटोमध्ये तणाव
केवळ पैशांचे आमिष दाखवून ट्रम्प थांबलेले नाहीत. त्यांनी गरज पडल्यास लष्करी पर्यायाचा वापर करण्याचीही धमकी दिली आहे. "आम्ही तिथे काहीतरी करणारच, त्यांना आवडो किंवा नाही," अशा शब्दांत ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. या धमकीमुळे नाटो देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत "ग्रीनलँड विक्रीसाठी नाही," असे ठणकावून सांगितले आहे.
नागरिकांची अवस्था: इकडे आड, तिकडे विहीर!
ग्रीनलँडमधील स्थानिक नागरिकांमध्ये या घडामोडींमुळे भीती आणि संभ्रमाचे वातावरण आहे. काही लोकांना ही पैशांची ऑफर विकासाची संधी वाटत असली, तरी बहुतेकांना आपली स्वतंत्र ओळख पुसली जाण्याची भीती आहे. "आम्ही ना अमेरिकन होऊ इच्छितो, ना डॅनिश; आम्हाला फक्त ग्रीनलँडर म्हणून जगायचे आहे," अशी भावना तिथल्या विरोधी पक्षाने व्यक्त केली आहे.