एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:14 IST2025-10-24T14:13:56+5:302025-10-24T14:14:25+5:30
Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या लहरी स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. ते कधी कोणती घोषणा करतील, याचा अनेकांना अंदाज नाही. काल डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरात्री झोपायला जाण्यापूर्वी कॅनडासोबतच्या ट्रेड डिलची चर्चा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा सोशल मीडियावरून केली.

एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या लहरी स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. ते कधी कोणती घोषणा करतील, याचा अनेकांना अंदाज नाही. काल डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरात्री झोपायला जाण्यापूर्वी कॅनडासोबतच्या ट्रेड डिलची चर्चा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा सोशल मीडियावरून केली. ट्रम्प यांनी केलेल्या या घोषणेमुळे अमेरिकेचा शेजारील देश असलेल्या कॅनडाची ऐन मध्यरात्री झोप उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयासाठी एक जाहीरात कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. टीव्हीवरील एका जाहीरातीमधून अमेरिकेतील टॅरिफला विरोध करण्यात आला होता. तसेच त्यामध्ये माहितीची चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आली होती, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. तसेच कॅनडाने अमेरिकन कोर्टाच्या निर्णयांना प्रभावित करण्याच्या इराद्याने हे कृत्य केल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
या संदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले की, कॅनडाने फसवणूक करून एक जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या जाहीरातीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन हे टॅरिफबाबत नकारात्मक बोलताना दिसत आहेत. मात्र ही जाहीरात खोटी आहे, अशी घोषणा रोनाल्ड रिगन फाऊंडेशनने नुकतीच केली आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून केलेल्या या घोषणेपूर्वी काही वेळ आधीच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आकारण्यात येणारं टॅरिफ हे धोकादायक असल्याचे विधान केले होते. तसेच अमेरिकेशिवाय इतर देशांमध्ये आपली निर्यात दुप्पट करण्याची घोषणा केली होती.
डोनाल्ड ट्रम्प आरोप करताना पुढे म्हणाले की, ही जाहीरात ७.५ कोटी डॉलरची होती. कॅनडाने अमेरिकन सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी हे कृत्य केलं आहे. टॅरिफ हे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहे. कॅनडाने केलेल्या या वर्तनामुळे कॅनडासोबतची सर्व व्यापारी चर्चा रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.