गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 23:17 IST2025-10-05T23:16:17+5:302025-10-05T23:17:18+5:30
Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील युद्धविरामावरून हमासला शेवटचा इशारा दिला आहे. जर हमासने गाझामधील सत्ता सोडण्यास नकार दिला, तसेच शांतता प्रस्ताव नाकारला तर त्यांची पूर्णपणे धुळधाण उडवली जाईल, अशी सक्त ताकिद डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील युद्धविरामावरून हमासला शेवटचा इशारा दिला आहे. जर हमासने गाझामधील सत्ता सोडण्यास नकार दिला, तसेच शांतता प्रस्ताव नाकारला तर त्यांची पूर्णपणे धुळधाण उडवली जाईल, अशी सक्त ताकिद डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील शांततेच्या योजनेचा स्वीकार करण्यासाठी हमासला रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ दिली होती. त्यानंतर आता ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प, हमासला इशारा देताना म्हणाले की, जर हमासने गाझामधील सत्ता सोडण्यास नकार दिला, तसेच शांतता प्रस्ताव स्वीकार करण्यास नकार दिला, तर त्यांना पूर्णपणे नष्ट केलं जाईल. यावेळी बेंजामिन नेतन्याहू यांचा गाझामधील बॉम्बवर्षाव थांबवण्यास आणि अमेरिकेच्या शांतता प्रस्तावास पाठिंबा आहे का? असं विचारलं असता डोनाल्ड ट्रम्प यांनी होकारार्थी उत्तर दिलं. तसेच हमास खरोखरच शांततेसाठी कटीबद्ध आहे का, हे लवकरच आपल्याला समजेल असेही त्यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या २० सूत्री शांतता प्रस्तावामधून गाझामधील सध्याचा संघर्ष थांबवण्यासोबत गाझातील युद्धोत्तर प्रशासनाचं एक स्ट्रक्चर तयार केलं आहे. एवढंच नाही तर ट्रम्प यांचा शांतता प्रस्ताव हा गझामधील संघर्ष संपवण्यासाठी आणि भविष्यातील प्रशासनासाठीची ब्लूप्रिंट असल्याचा दावा व्हाईट हाऊसने केला आहे.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी गाझामधील संघर्ष अद्याप थांबलेला नसल्याचे सांगितले. तसेच हमासच्या तावडीतून ओलिसांची सुटका करून घेणं हा केवळ पहिला टप्पा आहे, तसेच पुढील व्यवस्थेवर अजूनही काम सुरू आहे, असे सांगितले.