'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 20:24 IST2026-01-11T20:22:42+5:302026-01-11T20:24:31+5:30
Donald Trump warns Cuba: डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत थेट धमकी दिली.

'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
Donald Trump warns Cuba: व्हेनेझुएलामध्ये केलेल्या लष्करी कारवाईनंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'क्युबा'वर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी क्युबाला थेट इशारा देत, “वेळेत अमेरिका सोबत करार करा, अन्यथा तेल आणि आर्थिक मदत पूर्णपणे थांबवली जाईल,” असे म्हटले आहे.
ट्रुथ सोशलवरून थेट इशारा
ट्रम्प यांनी रविवारी (11 जानेवारी 2025) त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Truth Social वर पोस्ट करत लिहिले, क्युबाला आता ना तेल मिळेल, ना पैसा! खूप उशीर होण्याआधी त्यांनी करारावर स्वाक्षरी करावी, असा माझा सल्ला आहे.
ट्रम्प यांनी पुढे असा आरोप केला की, क्युबा अनेक वर्षे व्हेनेझुएलाकडून मिळणाऱ्या मोठ्या प्रमाणातील तेल आणि निधीवर अवलंबून होता आणि त्याच्या बदल्यात क्युबाने व्हेनेझुएलातील सत्ताधाऱ्यांना ‘सुरक्षा सेवा’ पुरवल्या.
व्हेनेझुएलावर कारवाईनंतर तणाव वाढला
अमेरिकेने 3 जानेवारी 2025 रोजी व्हेनेझुएलामध्ये लष्करी कारवाई करत तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पत्नीसह अटक केली. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात करण्यात आली असून, मादुरो यांच्यावर न्यूयॉर्क न्यायालयात खटला चालवला जात आहे. अमेरिकेने दावा केला की, या लष्करी कारवाईत मोठ्या प्रमाणात क्युबाशी संबंधित घटकांचा सहभाग होता आणि आता व्हेनेझुएलाला अशा गुंड आणि खंडणीखोरांपासून संरक्षणाची गरज नाही.
व्हेनेझुएलाच्या संरक्षणासाठी अमेरिका सज्ज
ट्रम्प यांनी पुढे म्हटले, आता व्हेनेझुएलाच्या पाठीशी अमेरिका उभी आहे. जगातील सर्वात शक्तिशाली लष्कर त्यांचे संरक्षण करेल. क्युबाला आता कोणतेही तेल किंवा निधी दिला जाणार नाही.
क्युबाचा संतप्त प्रतिसाद
या घडामोडींवर क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगुएल डियाझ-कॅनेल यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हवाना येथील अमेरिकन दूतावासासमोर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या रॅलीत त्यांनी अमेरिकेच्या कारवाईचा निषेध केला. डियाझ-कॅनेल म्हणाले, क्युबा या कारवायांचा तीव्र निषेध करतो. ही दहशतवादाची कृती आहे. हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आहे. अमेरिका ज्या शांततापूर्ण देशावर हल्ला करत आहे, तो देश अमेरिकेसाठी कोणताही धोका नव्हता.
क्युबासाठी तेलपुरवठा धोक्यात
दरम्यान, व्हेनेझुएला क्युबाला सुमारे 30 टक्के तेलपुरवठा करतो. त्याच्या बदल्यात क्युबा व्हेनेझुएलाला वैद्यकीय कर्मचारी आणि सेवा पुरवतो. तज्ज्ञांच्या मते, हा तेलपुरवठा बंद झाल्यास क्युबाच्या आधीच कमकुवत असलेल्या वीज आणि ऊर्जा पुरवठ्यावर मोठे संकट येऊ शकते.