"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 00:01 IST2025-10-01T00:00:59+5:302025-10-01T00:01:21+5:30
Donald Trump Warning Hamas : शांतता प्रस्तावाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडले रोखठोक मत

"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
Donald Trump Warning Hamas : इस्रायल आणि हमास संघटना यांच्यातील गाझा पट्टीत सुरू असलेला संघर्ष काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी अनेकदा युद्ध थांबवण्याबाबत संवाद साधला. पण नेतान्याहू यांनी हमासचा नायनाट करण्याचा चंगच बांधला आहे. अशातच आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट हमासला धमकी दिली आहे. "शांतता कराराला प्रतिसाद देण्यासाठी हमासला तीन किंवा चार दिवसांचा अवधी दिला जाईल. अरब, मुस्लिम आणि इस्रायली देश सर्वच या करारासाठी तयार आहेत. आता फक्त हमासची मान्यता बाकी आहे. जर हमासने ऐकले नाही तर मात्र याचे परिणाम भयानक होऊ शकतात," अशी थेट धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिली आहे.
#WATCH | On how long he plans to give Hamas to respond, US President Donald Trump says, "We're going to do about three or four days... All of the Arab countries are signed up. The Muslim countries are all signed up. Israel is all signed up. We're just waiting for Hamas, and Hamas… pic.twitter.com/JmsGQJ7Xl1
— ANI (@ANI) September 30, 2025
ट्रम्प म्हणाले, "सर्व ओलिस ठेवलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्याचा अमेरिकेचा विचार आहे. तसेच यासंदर्भात त्यांना हमासकडून चांगली वागणूक अपेक्षित आहे. अमेरिकेकडून उचलण्यात येणारे हे पाऊल म्हणजे एक अतिशय खास उपक्रम आहे. यापूर्वी असे कधीही केले गेलेले नाही. विशेष म्हणजे, हा उपक्रम फक्त गाझा पट्टीबद्दल नाही तर संपूर्ण मध्य पूर्वेबद्दल आहे. हा उपक्रम खूप सरळ आणि स्पष्ट उद्दिष्ट्ये असणारा आहे."
हमास काय निर्णय घेणार?
डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील युद्ध संपवण्यासाठी २० कलमी योजना सादर केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही ट्रम्पच्या योजनेला सहमती दर्शवली आहे. आता सर्वांच्या नजरा हमासवर आहेत. मुस्लिम देशांची भूमिकाही महत्त्वाची ठरली आहे. सौदी अरेबिया, जॉर्डन, युएई, कतार, इंडोनेशिया, तुर्की, पाकिस्तान आणि इजिप्तच्या नेत्यांनीही या योजनेचे स्वागत केले आहे. अटी पूर्ण झाल्यास आणि ओलिसांची सुरक्षित सुटका शक्य झाल्यास ही प्रादेशिक शांततेची चांगली संधी असू शकते असे अमेरिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे आता हमासच्या भूमिकेकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.