अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 09:46 IST2026-01-07T09:46:16+5:302026-01-07T09:46:40+5:30
Donald Trump Venezuela Oil Plan: निकोलस मादुरोच्या अटकेनंतर व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचे नियंत्रण. एक्सॉन आणि शेवरॉन कंपन्यांसोबत ओव्हल ऑफिसमध्ये बैठक. वाचा सविस्तर.

अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडवून देणारी घोषणा केली आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकन सुरक्षा दलांनी ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच, आता व्हेनेझुएलातून ५ कोटी (५० दशलक्ष) बॅरल कच्चे तेल अमेरिकेत आणले जाणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, "व्हेनेझुएला आता एका नव्या वाटेवर आहे आणि तेथील नैसर्गिक संसाधनांचा वापर आता अमेरिकेच्या आणि तेथील जनतेच्या हितासाठी केला जाईल." या निर्णयामुळे अमेरिकेतील इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता असून, जागतिक तेल पुरवठ्यावर अमेरिकेचे नियंत्रण अधिक मजबूत होणार आहे. व्हेनेझुएलाचा सुमारे ५ कोटी बॅरल कच्च्या तेलाचा साठा आता अमेरिकेच्या ताब्यात येणार असून, या व्यवहाराचे मूल्य सुमारे २.८ अब्ज डॉलर इतके असण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकन फौजांनी एका धाडसी कारवाईत निकोलस मादुरो यांना अटक केली होती. त्यानंतर व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यांवर अमेरिकेने आपले लक्ष केंद्रित केले आहे. ट्रम्प यांच्या मते, हा व्यवहार अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि ऊर्जा स्वातंत्र्यासाठी ऐतिहासिक पाऊल ठरेल. या तेलातून मिळणार पैसा कसा आणि कुठे वापरायचा यावर मात्र अमेरिकेचेच नियंत्रण राहणार आहे. व्हेनेझुएला जागतिक दरानुसार अमेरिकेला हे कच्चे तेल पाठविणार आहे. यातून येणाऱ्या पैशांचा वापर दोन्ही देशांसाठी करणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच या कच्च्या तेलातून आलेल्या पैशांवर अमेरिकेचा डोळा असल्याचे खुद्द ट्रम्प यांनीच जाहीर केले आहे.
व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा तेल साठा आहे, मात्र सध्या तेथे दररोज केवळ १० लाख बॅरल तेल उत्पादन होते. ट्रम्प प्रशासनाचे उद्दिष्ट हे उत्पादन वाढवून अमेरिकेसह जागतिक बाजारात इंधनाचे दर कमी करणे हे आहे. अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन एडमिनिस्ट्रेशन (EIA) नुसार, ट्रम्प यांनी जाहीर केलेला ५ कोटी बॅरलचा साठा हा अमेरिकेच्या अडीच दिवसांच्या गरजेइतका आहे. या प्रक्रियेला वेग देण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये शुक्रवारी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत एक्सॉन (Exxon), शेवरॉन (Chevron) आणि कोनोकोफिलिप्स (ConocoPhillips) यांसारख्या जगातील दिग्गज तेल कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. व्हेनेझुएलाच्या मोडकळीस आलेल्या तेल पायाभूत सुविधांचे पुनरुज्जीवन करणे आणि अमेरिकन कंपन्यांची तिथे पुन्हा गुंतवणूक कशी वाढवता येईल, यावर या बैठकीत चर्चा होईल.
जागतिक प्रतिक्रिया आणि विरोध
ट्रम्प यांच्या या निर्णयावर रशिया आणि चीन यांसारख्या देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "दुसऱ्या देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर अशा प्रकारे ताबा मिळवणे हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे," अशी टीका जागतिक स्तरावर होत आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाने 'अमेरिका फर्स्ट' धोरणानुसार हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.