मोठा प्लॅन! ट्रम्प व्हेनेझुएलाचे कच्चे तेल विकून पैसे कमविणार, अमेरिकी कंपन्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:01 IST2026-01-04T09:00:19+5:302026-01-04T09:01:28+5:30
Donald Trump Venezuela News: व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा साठा असूनही, निकोलस मादुरो यांच्या कार्यकाळात तिथल्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या होत्या.

मोठा प्लॅन! ट्रम्प व्हेनेझुएलाचे कच्चे तेल विकून पैसे कमविणार, अमेरिकी कंपन्या...
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ राजकीयच नव्हे, तर आर्थिक सत्तापालटाचेही संकेत दिले आहेत. व्हेनेझुएलाची कोलमडलेली तेल यंत्रणा सुधारण्यासाठी अमेरिकन कंपन्या आता तिथे मोठी गुंतवणूक करतील, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.
ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीवर अमेरिकन कायद्यानुसार ड्रग्ज तस्करी आणि अंमली पदार्थांशी संबंधित कारवायांचे गुन्हे दाखल केले जातील. "अमेरिकन लष्कर आणि तपास यंत्रणांनी रात्रीच्या अंधारात अत्यंत धाडसी मोहीम राबवून मादुरो दाम्पत्याला जेरबंद केले आहे. आता त्यांना अमेरिकन न्यायालयात आपल्या कृत्यांचा हिशोब द्यावा लागेल," असे ट्रम्प यांनी मार-ए-लागो येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा साठा असूनही, निकोलस मादुरो यांच्या कार्यकाळात तिथल्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या होत्या. यावर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेतील मोठ्या तेल कंपन्या व्हेनेझुएलात जाऊन तिथल्या मोडकळीस आलेल्या तेल विहिरी आणि रिफायनरी दुरुस्त करतील.अमेरिका आता व्हेनेझुएलाच्या तेलाचा वापर करून जागतिक बाजारात तेल विक्री करेल, ज्यामुळे व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल.
"व्हेनेझुएलाचे तेल उत्पादन सध्या अत्यंत खालावले आहे. आम्ही तिथे आमची आधुनिक तंत्रज्ञान आणि भांडवल नेणार आहोत. यामुळे हा देश पुन्हा एकदा श्रीमंत आणि सुरक्षित होईल," असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.
व्हेनेझुएलाचे भविष्य काय?
व्हेनेझुएला आता पूर्णपणे अमेरिकेच्या नियंत्रणात असेल का? या प्रश्नावर ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत तिथे लोकशाही मार्गाने सत्तांतर होत नाही, तोपर्यंत अमेरिका या देशाचा कारभार पाहण्यास मदत करेल.