चीनी नागरिकासोबत 'मैत्री अन् सेक्स'वर बंदी; ट्रम्प सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी बनवले नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:00 IST2025-04-03T13:59:29+5:302025-04-03T14:00:02+5:30
कुठल्याही चीनी नागरिकासोबत मैत्री आणि शारीरिक संबंध ठेवता येणार नाहीत. परंतु चीनबाहेर तैनात अमेरिकन अधिकाऱ्यांवर हे निर्बंध लागू नाहीत.

चीनी नागरिकासोबत 'मैत्री अन् सेक्स'वर बंदी; ट्रम्प सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी बनवले नियम
अमेरिकन सरकारने चीनमधील त्यांच्या सरकारी कमचाऱ्यांसोबत कुटुंबातील सदस्यांसाठी नवीन नियम लागू केलेत. चीनी नागरिकासोबत कुठल्याही प्रकारे मैत्री अथवा लैंगिक संबंध ठेवण्यावर बंदी आणण्यात आली आहे. हा नियम चीनमध्ये काम करणाऱ्या अमेरिकन कंत्राटदारांवरही लागू असेल. जानेवारीत अमेरिकन राजदूत निकोलस बर्न्स यांनी चीन सोडण्यापूर्वी हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
काही अमेरिकन संस्थांनी याआधीच अशा नात्यांवर कठोर नियम लावले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ही माहिती दिली नाही परंतु न्यूज एजन्सी एपीच्या सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी प्रसारित केली आहे. चीनमधील अमेरिकन दूतावास कार्यालयात काम करणाऱ्या चीनी सुरक्षारक्षक आणि अन्य स्टाफसोबत मैत्री करण्यावर बंदी आणली आहे. जानेवारीत ते सर्व चीनी नागरिकांसाठी लागू करण्यात आले. मागील वर्षी अमेरिकन सरकार असे निर्बंध लावण्याचा विचार करत होती. आता या नव्या निर्बंधामुळे चीनमधील अमेरिकेच्या ग्वांगझू, शांघाई, शेनयांग, वुहान येथील दूतावास कार्यालयातील कर्मचाऱ्याला कुठल्याही चीनी नागरिकासोबत मैत्री आणि शारीरिक संबंध ठेवता येणार नाहीत. परंतु चीनबाहेर तैनात अमेरिकन अधिकाऱ्यांवर हे निर्बंध लागू नाहीत.
आदेशाचं उल्लंघन झाल्यास शिक्षा
सरकारने लागू केलेल्या नियमातंर्गत जर अमेरिकन कर्मचाऱ्याचे आधीपासून चीनी नागरिकासोबत मैत्री आहे तर त्याला यातून सूट दिली आहे परंतु ती सूट मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. तपासानंतर जर अर्ज फेटाळला गेला तर त्या अमेरिकन कर्मचाऱ्याला चीनी नागरिकासोबतचे संबंध संपवावे लागतील किंवा नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल. जर एखाद्याने नियमांचे पालन केले नाही तर त्याला तातडीने चीन सोडावे लागेल असंही आदेशात म्हटलं आहे.
का लागू केला नियम?
चीन हनीट्रॅपच्या माध्यमातून अमेरिकेची गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते असा दावा करण्यात येत आहे. चीनमध्ये तैनात अधिकारी, कर्मचाऱ्यांना समजवण्यात येते की, कशारितीने चीनी गुप्तचर विभाग आकर्षक महिलांचा वापर करून अमेरिकन अधिकाऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करते. त्याशिवाय अधिकाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने अनेक सीक्रेट एजेंट नियुक्त केलेत. त्यातून सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे.