Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 14:14 IST2025-09-05T14:10:14+5:302025-09-05T14:14:22+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेतील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांच्या प्रमुखांसाठी हाय प्रोफाइल डिनरचे आयोजन केले होते.

Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेतील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांच्या प्रमुखांसाठी हाय-प्रोफाइल डिनरचे आयोजन केले होते. या डिनर दरम्यान, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्या भारतातीलगुंतवणूकीवर भाष्य केले. तसेच, त्यांनी थेट विचारले की, अॅपल कंपनी अमेरिकेत किती गुंतवणूक करणार आहे?
काय म्हणाले ट्रम्प?
व्हाईट हाऊसमध्ये डिनर दरम्यान ट्रम्प यांनी टिम कुक यांच्यावर टीका करण्यासोबतच त्यांचे कौतुकही केले. ट्रम्प म्हणाले, 'टिम, तुम्ही अॅपलसोबत अविश्वसनीय काम केले आहे. हे करू शकणारे खूप कमी लोक आहेत. त्यासाठी अभिनंदन. तुम्ही इतरत्र गुंतवणूक केली आहे, आता तुम्ही अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहात. पण, मला सांगा, तुम्ही नेमकी किती गुंतवणूक करणार आहात?' यावर टिम कुक यांनी उत्तर दिले, '६०० अब्ज डॉलर्स (सुमारे ₹५० लाख कोटी).'
.@Apple CEO @tim_cook: "I want to thank you for setting the tone such that we could make a major [$600 billion] investment in the United States... That says a lot about your focus and your leadership and your focus on innovation." pic.twitter.com/289vkiB6vy
— Rapid Response 47 (@RapidResponse47) September 5, 2025
ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत पाच भारतीय
या डिनर पार्टीमध्ये तंत्रज्ञान जगतातील अनेक मोठ्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या, ज्यात बिल गेट्स (सह-संस्थापक, मायक्रोसॉफ्ट), मार्क झुकरबर्ग (सीईओ, मेटा), टिम कुक (सीईओ, अॅपल) यांचा समावेश होता. याशिवाय, या कार्यक्रमात भारतीय वंशाचे पाच प्रमुख टेक दिग्गज देखील उपस्थित होते. यामध्ये संजय मेहता (सीईओ, मायक्रोन), श्याम शंकर, एक्झिक्युटिव्ह, (पलांतीर), विवेक रणदिवे, अध्यक्ष (टिबको सॉफ्टवेअर), सत्या नाडेला (सीईओ, मायक्रोसॉफ्ट) आणि सुंदर पिचाई (सीईओ, गुगल) यांचा समावेश होता.
ट्रम्प यांचे इतर सीईओंना प्रश्न
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या बाजुला बसलेल्या मेटा सीईओ झुकरबर्ग यांनाही अमेरिकन गुंतवणुकीबद्दल हाच प्रश्न विचारला. त्यावर झुकरबर्ग यांनीही $600 अब्ज गुंतवणार असल्याचे सांगितले. पुढचा प्रश्न गुगलच्या गुंतवणुकीबद्दल होता, ज्यावर सीईओ सुंदर पिचाई यांनी उत्तर दिले, आम्ही पुढील दोन वर्षांत अमेरिकेत $250 अब्ज गुंतवणार आहोत. तर, मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीबद्दल सीईओ सत्या नाडेला यांनी उत्तर दिले, या वर्षी युनायटेड स्टेट्समध्ये आम्ही $75 ते $80 अब्जाची गुंतवणूक करणार आहोत. यावर ट्रम्प यांनी सर्व प्रमुखांचे आभार मानले.
Apple च्या भारतातील योजना
डोनाल्ड ट्रम्प यांनी मे महिन्यात टिम कुक यांच्या भारतातील गुंतवणूकीबाबत नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, Apple ने भारतात त्यांची उत्पादने बनवावी, असे त्यांना वाटत नाही. त्यांनी Apple ला अमेरिकेत गुंतवणूक करण्याचे आवाहनही केले होते. दरम्यान, आयफोन निर्माता कंपनी Apple चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतात मोठी गुंतवणूक करत आहे. यासाठी अॅपल विविध भारतीय कंपन्यांसोबत काम करत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अॅफल भारतात अंदाजे $2.5 अब्ज गुंतवण्याची योजना आखत आहे, जेणेकरून आयफोन उत्पादन क्षमता दरवर्षी 40 दशलक्ष युनिट्सवरून सुमारे 60 दशलक्ष पर्यंत वाढेल.