'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 11:40 IST2025-07-31T11:38:56+5:302025-07-31T11:40:56+5:30
Donald Trump On India-Russia: भारतावर कर लादल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशियाच्या संबंधांवर टीका केली आहे.

'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
Donald Trump On India-Russia: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल भारतावर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली. येत्या १ ऑगस्टपासून अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या भारतीय मालावर हा कर लागू असेल. दरम्यान, आता त्यांनी आता भारताबाबत आणखी एक धक्कादायक विधान केले आहे. भारत आणि रशियावर निशाणा साधत ट्रम्प म्हणाले की, भारत आणि रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्थांना आणखी बुडवणार.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले की, "भारत आणि रशिया एकमेकांशी काय व्यवहार करतात, त्याची आम्हाला पर्वा नाही. दोन्ही देश आपल्या मृत अर्थव्यवस्थांना आणखी बुडवू शकतात. आम्ही भारतासोबत फार कमी व्यापार केला आहे. त्यांचे कर खूप जास्त आहेत. त्याचप्रमाणे, रशिया आणि अमेरिकादेखील जवळजवळ कोणताही व्यापार करत नाहीत. याला असेच राहू द्या," असे ट्रम्प म्हणाले.
I don’t care what India does with Russia. They can take their dead economies down together, for all I care. We have done very little business with India, their Tariffs are too high, among the highest in the World. Likewise, Russia and the USA do almost no business together. Let's… pic.twitter.com/pZp9ENzerf
— ANI (@ANI) July 31, 2025
रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्यावर टीका
अमेरिकेच्या अध्यक्षांनी रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनाही लक्ष्य केले. मेदवेदेव यांनी इशारा दिला होता की, वॉशिंग्टन डीसीचा रशियासोबतचा अल्टिमेटम गेम युद्धाला कारणीभूत ठरू शकतो. त्यावर ट्रम्प म्हणाले, "रशियाचे अपयशी माजी अध्यक्ष मेदवेदेव, जे अजूनही स्वतःला राष्ट्रपती मानतात, त्यांना त्यांच्या शब्दांकडे लक्ष देण्याची गरज आहे. ते एका अतिशय धोकादायक क्षेत्रात प्रवेश करत आहेत."
भारत-रशिया संरक्षण संबंध
भारत गेल्या काही वर्षांपासून रशियाकडून संरक्षण उपकरणे, तेल आणि ऊर्जा संसाधने खरेदी करत आहे. अलिकडच्या काळात, भारताने रशियाकडून S-400 हवाई संरक्षण प्रणाली, कच्चे तेल आणि इतर सामरिक संसाधने आयात करणे सुरू ठेवले आहे, ज्याकडे अमेरिका सातत्यानने टीका करते. भारताने आतापर्यंत अमेरिकेशी मजबूत संबंध राखले असले तरी, रशियाशी त्याचे दशकांपूर्वीचे धोरणात्मक संबंध देखील आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आधार एक स्वायत्त आणि बहुपक्षीय दृष्टिकोन आहे.