डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी! चीन आणि ब्रिटनचा युद्धनौका पाठवण्यास नकार; इराणकडून अमेरिका-इस्रायलची नाकेबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 08:23 IST2026-03-15T08:21:42+5:302026-03-15T08:23:35+5:30
Donald Trump on Hormuz Strait: आखाती देशांत तणाव वाढला! ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांना युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे, तर इराणने अमेरिकेवर जोरदार निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर.

डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी! चीन आणि ब्रिटनचा युद्धनौका पाठवण्यास नकार; इराणकडून अमेरिका-इस्रायलची नाकेबंदी
आखाती देशांमधील तणाव आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आवाहनानंतरही चीन आणि ब्रिटनने होर्मुजच्या सामुद्रधुनीत आपल्या युद्धनौका तैनात करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. यामुळे अमेरिकेच्या जागतिक आवाहनाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
मिडल ईस्टमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना इराणने एक मोठी घोषणा केली आहे. "होर्मुजची सामुद्रधुनी केवळ अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांसाठी बंद राहील. या दोन देशांव्यतिरिक्त जगातील इतर सर्व देशांच्या जहाजांना या मार्गावरून जाण्याची पूर्ण परवानगी आहे," असे इराणने स्पष्ट केले आहे. यामुळे या भागात अमेरिका आणि इस्रायलची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा अपयशी - इराण
इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर सडकून टीका केली आहे. "जगाला सुरक्षा देण्याच्या बाता मारणारा अमेरिका आज होर्मुज सुरक्षित करण्यासाठी इतरांकडे मदत मागत आहे. अमेरिकेचे सुरक्षा कवच पश्चिम आशियाई देशांचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे," असे अराघची यांनी म्हटले आहे.
"अमेरिका आता चीनकडे भीक मागतोय"
ट्रम्प यांच्या या विधानावर इराणने अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले की, "व्हाईट हाऊसचे धोरण तणाव कमी करण्याऐवजी तो वाढवणारे आहे. ज्या अमेरिकेने आशियावर आपले वर्चस्व गाजवण्याचे स्वप्न पाहिले, तोच अमेरिका आज आपली सुरक्षा यंत्रणा कमकुवत झाल्यामुळे चीनसारख्या देशांकडे मदत मागत आहे."
काय आहे सध्याची स्थिती?
ट्रम्प यांना अपेक्षा होती की चीन, फ्रान्स, जपान आणि ब्रिटन व इतर देश आपल्या नौदलाची ताकद या भागात तैनात करतील. मात्र, चीन आणि ब्रिटनने नकार कळविला आहे. होर्मुज हा जागतिक तेल व्यापाराचा मुख्य मार्ग असल्याने, या राजकीय कुरघोडीचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर होण्याची दाट शक्यता आहे.