'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 08:12 IST2025-11-07T08:06:32+5:302025-11-07T08:12:48+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफची धमकी देऊन भारत पाकिस्तानातील युद्ध थांबवल्याचा दावा केला.

'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवल्याचा जुना दावा पुन्हा एकदा ठामपणे मांडून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. बुधवारी फ्लोरिडा येथील मियामीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी आपल्या या कथित हस्तक्षेपात काही नवीन तपशील जोडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की त्यांनी टॅरिफद्वारे भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध टाळण्यास मदत केली. त्यांचा दावा आहे की या संघर्षात आठ लष्करी विमानांचे नुकसान झाले. भारताने हा दावा फेटाळून लावला आहे.
भारत आणि पाकिस्तानला पूर्ण युद्धात उतरण्यापासून थांबवण्यासाठी टॅरिफचा वापर केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, जगातील दोन अणुशक्ती असलेल्या राष्ट्रांमध्ये, म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात पूर्ण युद्ध भडकले असताना, त्यांनी कोणतेही पारंपरिक राजनैतिक मार्ग न वापरता थेट टॅरिफ आणि व्यापार करार रद्द करण्याच्या धमकीचा वापर केला.
ट्रम्प म्हणाले की, "मी या दोघांसोबत (भारत आणि पाकिस्तान) व्यापार करार करण्याच्या मध्यभागी असताना, मला कळले की, ते युद्ध करणार आहेत. ते दोन अणुशक्ती असलेले देश होते. मी स्पष्टपणे सांगितले की, जोपर्यंत तुम्ही शांततेसाठी सहमत होत नाही, तोपर्यंत मी तुमच्यासोबत कोणतेही व्यापार करार करणार नाही." ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, त्यांनी ९ मे रोजी हा कठोर पवित्रा घेतला. या धमकीने दोन्ही देशांना धक्का बसला आणि माघार घ्यावी लागली.
ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांच्या या धमकीनंतर अवघ्या २४ तासांत, म्हणजेच १० मे २०२५ रोजी, दोन्ही देशांनी युद्धविराम केल्याची आणि सर्व लढाया थांबवण्याची घोषणा केली. "एका दिवसांनंतर मला फोन आला, आम्ही शांतता करार केला आहे. टॅरिफमुळेच हे शक्य झाले," असे ट्रम्प म्हणाले.
यावेळी ट्रम्प यांनी संघर्षातील नुकसानीचा आकडाही वाढवला. यापूर्वी त्यांनी सात विमाने पाडल्याचा दावा केला होता, मात्र आता त्यांनी या लष्करी संघर्षात एकूण आठ विमाने पाडण्यात आल्याचा नवा तपशील जोडला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये आठ विमाने पाडण्यात आली. पूर्वी ही संख्या सात होती, आता ती आठ झाली आहे," असं ट्रम्प म्हणाले.
भारताकडून ट्रम्प यांचा दावा फेटाळला
दरम्यान, ट्रम्प यांनी केलेल्या या हस्तक्षेपाच्या दाव्याला भारताने पुन्हा एकदा ठामपणे फेटाळून लावले आहे. नवी दिल्लीने स्पष्ट केले आहे की, ट्रम्प यांनी वारंवार केलेल्या या दाव्यात कोणताही आधार नाही. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, या काळात भारत-अमेरिका व्यापार करार किंवा भारत-पाकिस्तानमधील अमेरिकेचे मध्यस्थी यासारख्या कोणत्याही विषयावर कोणतीही चर्चा झाली नव्हती. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम दोन्ही बाजूंच्या लष्करी संपर्क माध्यमांद्वारे साध्य झाला होता आणि यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप नव्हता.
जम्मूमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर ट्रम्प हे सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर या शांततेचे श्रेय स्वतःकडे घेत आहेत.