Donald Trump: "खूप मोठी किंमत मोजावी लागेल" व्हाईट हाऊस जवळील गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 10:00 IST2025-11-27T09:55:30+5:302025-11-27T10:00:05+5:30
America Shooting News: अमेरिकेत बुधवारी दिवसाढवळ्या नॅशनल गार्ड्सवर गोळीबार केल्याची घटना घडली.

Donald Trump: "खूप मोठी किंमत मोजावी लागेल" व्हाईट हाऊस जवळील गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले!
अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमधील 'व्हाईट हाऊस'जवळ तैनात असलेल्या नॅशनल गार्ड्सवर गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ माजली. या गोळीबारात दोन नॅशनल गार्ड्स गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना गंभीर इशारा दिला. त्यांनी या घटनेतील हल्लेखोराचा उल्लेख 'प्राणी' असा केला असून त्याला मोठी किंमत मोजावी लागेल, असेही ते म्हणाले.
या गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर संतापजनक पोस्ट केली. "एका प्राण्याने आपल्या दोन नॅशनल गार्डवर गोळीबार केला. या घटनेत दोन्ही गार्ड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. शिवाय, हल्लेखोरही जखमी असून त्याला मोठी किंमत मोजावी लागेल. आपले दोन्ही गार्ड लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. हे खरोखरच महान लोक आहेत. मी, युनायटेड स्टेट्सचा अध्यक्ष म्हणून आणि प्रेसिडेंसी कार्यालयाशी संबंधित प्रत्येकजण तुमच्यासोबत उभा आहे."
हल्लेखोराची ओळख पटली
व्हाईट हाऊसपासून सुमारे दोन ब्लॉक अंतरावर असलेल्या सबवे स्टेशनजवळ ही घटना घडली. मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाच्या कार्यकारी सहाय्यक प्रमुखांनी सांगितले की, गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील इतर नॅशनल गार्डच्या जवानांनी संशयिताला घेरले. या चकमकीत हल्लेखोरालाही गोळी लागली असून त्यालाही रुग्णालयात नेण्यात आले. संशयिताची ओळख पटली असून त्याचे नाव रहमानउल्लाह लकनवाल (वय, २९) आहे, जो २०२१ मध्ये अमेरिकेत घुसला होता, असे सांगण्यात आले.
कारण अस्पष्ट
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स म्हणाले की, संबंधित व्यक्तीने गोळीबार का केला? त्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. एफबीआय संचालक काश पटेल यांनी या घटनेचे वर्णन 'हल्ला' म्हणून केले. तर, डी.सी.चे महापौर बाउसर यांनी याला लक्ष्यित गोळीबार म्हटले.