"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:06 IST2026-04-08T17:04:11+5:302026-04-08T17:06:07+5:30
वेंस म्हणाले, दीर्घकालीन करारासाठी इराणने सद्भावनेने चर्चा करावी; कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी खेळले जाऊ शकेल.

"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
महिनेभर चाललेल्या भीषण युद्धानंतर अखेर अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाली. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी बुधवारी या नाजूक शांतता कराराचे स्वागत केले. मात्र, स्वागत करतानाच त्यांनी तेहरानला कडक शब्दांत इशाराही दिला आहे. वेंस म्हणाले, दीर्घकालीन करारासाठी इराणने सद्भावनेने चर्चा करावी; कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी खेळले जाऊ शकेल.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेली मुदत संपण्यापूर्वीच हा दोन आठवड्यांचा शांतता करार अस्तित्वात आला आहे. ट्रम्प यांनी 'एकतर करार करा, नाहीतर विनाशाला सामोरे जा' असा थेट इशारा दिला होता. दरम्यान, इराणने सावध भूमिका घेत म्हटले आहे की, जोपर्यंत औपचारिक अटींवर बोलणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत युद्ध पूर्णपणे संपले असे मानले जाणार नाही. बुडापेस्ट दौऱ्यावर असताना वेंस यांनी आशा व्यक्त केली की, जर इराणी प्रशासनाने प्रामाणिकपणे सहकार्य केले, तर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो.
लावन बेटावरील तेल रिफाइनरीवर मोठा हल्ला -
युद्धविरामाची घोषणा होऊन काही तास उलटत नाहीत तोच, बुधवारी इराणच्या लावन बेटावरील तेल रिफाइनरीवर मोठा स्फोट झाला. या हल्ल्यामुळे रिफाइनरीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने म्हटले आहे, परंतु हा स्फोट होता की हल्ला यासंदर्भात अद्याप स्पष्टता नाही.