ट्रम्प यांचा खळबळजनक दावा! म्हणे, 'इराणच अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, म्हणून आम्ही इस्रायलला हल्ल्यासाठी भाग पाडले'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 02:46 IST2026-03-04T02:46:15+5:302026-03-04T02:46:36+5:30
Donald Trump Iran attack claim:

ट्रम्प यांचा खळबळजनक दावा! म्हणे, 'इराणच अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, म्हणून आम्ही इस्रायलला हल्ल्यासाठी भाग पाडले'
वॉशिंग्टन: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्ध आता एका नवीन वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराण लवकरच अमेरिकेवर मोठा हल्ला करण्याची योजना आखत होता. त्यामुळेच अमेरिकेने खबरदारी म्हणून इस्रायलला तेहरानवर हल्ले करण्यास भाग पाडले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांच्या मते, मध्यस्थीने सुरू असलेल्या चर्चेची दिशा पाहता, इराण अमेरिकेवर हल्ल्याची तयारी करत असल्याची त्यांना खात्री होती. जरी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी असा कोणताही धोका नसल्याचे म्हटले होते, तरीही ट्रम्प यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. जेव्हा ट्रम्प यांना विचारण्यात आले की, इस्रायलने त्यांच्यावर हल्ल्यासाठी दबाव आणला होता का? त्यावर ट्रम्प म्हणाले, "नाही, उलट कदाचित मीच त्यांना (इस्रायलला) हल्ल्यासाठी भाग पाडले असावे."
इराणच्या नेतृत्वावर भाष्य
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणचे नेतृत्व कोणाकडे असावे, यावर ट्रम्प म्हणाले की, निर्वासित राजपुत्र रेझा पहलवी यांच्याऐवजी इराणच्या आतूनच कोणीतरी नेतृत्व करावे. "आम्हाला असा नेता नको आहे जो खामेनेईंइतकाच वाईट असेल," असेही त्यांनी नमूद केले.
स्पेन आणि ब्रिटनवर संताप
स्पेनने इराणवरील हल्ल्यासाठी आपले लष्करी तळ वापरण्यास अमेरिकेला नकार दिला आहे. यामुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी स्पेनसोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. तसेच ब्रिटनच्या अशाच प्रकारच्या भूमिकेवर त्यांनी टीका केली आहे. स्पेनने आणि ब्रिटनने अमेरिकेविरोधात उघड भूमिका घेतली आहे.
स्पेनशी व्यापार तोडणार?
ट्रम्प यांनी अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांना स्पेनसोबतचे सर्व करार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. "स्पेनची वागणूक अत्यंत वाईट आहे, आम्हाला त्यांच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही," असे ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.