ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:21 IST2025-09-30T19:18:28+5:302025-09-30T19:21:07+5:30
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा फीमध्ये मोठी वाढ केल्यानंतर अनेक दिग्गज अमेरिकन कंपन्यांनी आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे.

ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच H1B व्हिसा फीमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकन कंपन्यांचे लक्ष भारतातील ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स (GCCs) कडे वेधले गेले आहे. भारतात सध्या एकूण जगाच्या अर्ध्याहून अधिक जीसीसी केंद्रे असून, AI आणि Drug Discovery यांसारख्या उच्च मूल्य असलेल्या कामांचे हब म्हणून वेगाने विकसित होत आहे.
ट्रम्प प्रशासनाने नवीन H1B अर्जांसाठी १ लाख डॉलर (सुमारे ८८ लाख रुपये) इतकी फी लागू केली आहे, जी पूर्वीच्या १,५०० ते ४,००० डॉलर फीपेक्षा तब्बल ७० पट जास्त आहे. या निर्णयामुळे, अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मात्र, उद्योगतज्ज्ञांचे मत आहे की, या पावलामुळे भारतातील जीसीसींना मोठा फायदा होईल. अमेरिकन कंपन्या AI, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, सायबर सिक्युरिटी आणि अॅनालिटिक्ससारखी कामे भारतात हस्तांतरित करण्याची शक्यता आहे.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, भारतात सध्या १,७०० जीसीसी केंद्रे आहेत, जी जागतिक संख्येच्या अर्ध्याहून अधिक आहेत. ही केंद्रे केवळ टेक सपोर्टपुरती मर्यादित न राहता, लक्झरी कार डॅशबोर्ड डिझाईनपासून औषध संशोधनापर्यंत उच्च मूल्य असलेल्या नवकल्पनांचे हब बनली आहेत. डेलॉइट इंडियाचे भागीदार आणि जीसीसी इंडस्ट्री लीडर रोहन लोबो यांनी सांगितले की, भारतातील जीसीसी अमेरिकन कंपन्यांच्या रणनीतिक बदलांना गती देण्यासाठी सज्ज आहेत. काही कंपन्या तर भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय भारतासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो.